उस्मानाबाद : पुणे जिल्ह्यातील मोटारसायकल चोरीचा पर्दाफाश करून पोलिसांनी मुद्देमालासह एकास अटक केली . स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कळंब तालुक्यातील येरमाळा येथे मंगळवारी ( दि .१४ ) ही कारवाई केली . याप्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे . याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखालील सहायक पोलीस निरीक्षक श्री . पवार , पोहेकॉ कवडे काझी , शेळके , पोना घुगे , पोकाँ सर्जे , जाधवर , कोळी यांचे पथक मंगळवारी पहाटे येरमाळा येथे गस्तीसाठी फिरत होते . दरम्यान त्यांना गुप्त बातमीदारामार्फत येरमाळा येथे एक तरुणाकडे संशयीत मोटारसायकल असल्याची माहिती समजली . त्यावरून पथकाने येरमाळा- बीड महामार्गालगतच्या एका बंद असलेल्या रसायन निर्मीती कारखान्यामागे धाड टाकून एका संशयीतास ताब्यात घेतले . त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याचे नाव योगेश अरुण कसबे ( वय २४ , रा . हदगाव , ता . केज ) असल्याचे समजले . यावेळी त्याच्या ताब्यात आढळलेल्या ६ मोटारसायकलच्या मालकीविषयी विचारपुस केली असता तो पोलिसांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही . पथकाने वाहनांचे सांगाडा व इंजीन क्रमांकावरुन शोध घेतला असता त्यातील ४ मोटारसायकल या पुणे जिल्ह्यातून चोरीस गेल्याने गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले . उर्वरीत २ मोटारसायकल सुध्दा चोरीच्या असाव्यात असा पोलिसांना संशय आहे . आरोपीस उर्वरीत तपासकामी मोटारसायकलसह येरमाळा पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे .
0 Comments