धाराशिव, (शेख जाफरोद्दीन रब्बानी) :
धाराशिव शहराच्या राजकीय चर्चांमध्ये सध्या एक नाव पुन्हा चर्चेत आले आहे — ते म्हणजे माजी नगर उपाध्यक्ष जफर अली मर्चंट शहराच्या जुन्या राजकीय फळीतील अनुभवी आणि प्रभावशाली मुस्लिम नेते म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळे येणाऱ्या नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते पुन्हा सक्रिय होतील का? हा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.
जफर अली मर्चंट हे दोन कार्यकाळ नगरसेवक म्हणून निवडून आलेले असून, 2003 साली उस्मानाबाद नगर परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या कार्यकाळात शहरात विविध विकासकामांना चालना मिळाली होती. स्वच्छता, रस्ते दुरुस्ती, पाणीपुरवठा अशा नागरिकांच्या दैनंदिन गरजांशी संबंधित विषयांवर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले होते.
2016 साली झालेल्या नगर परिषद निवडणुकीत जफर अली मर्चंट यांनी एआयएमआयएम (AIMIM) या पक्षाकडून पुरस्कृत नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली होती. त्या वेळी ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते. विशेष म्हणजे, त्या निवडणुकीत त्यांना प्रत्येक समाजाकडून मतांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.
सध्या धाराशिव शहरातील नागरिक आणि स्थानिक कार्यकर्ते “जफर अली मर्चंट यांनी आगामी नगर परिषद निवडणुकीत पुन्हा मैदानात उतरावे” अशी मागणी करत आहेत. शहरातील अनुभवी आणि कार्यक्षम नेतृत्व म्हणून त्यांचे नाव जनतेत लोकप्रिय राहिले आहे.
जफर अली मर्चंट हे माजी मंत्री डॉ. पदमसिंह पाटील यांचे विश्वासू सहकारी राहिले असून, त्यांनी दीर्घकाळ राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्य केले आहे. शहराच्या विकासासाठी त्यांची नेहमी सक्रीय भूमिका राहिल्यामुळे नागरिक आजही त्यांना आपले नेते मानतात.
धाराशिवच्या आगामी राजकीय समीकरणांमध्ये जफर अली मर्चंट पुन्हा सक्रिय होतील का? आणि त्यांनी उमेदवारी दिल्यास त्यांचा प्रभाव किती असेल, हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे.
0 Comments