Ad Code

Responsive Advertisement

आमदार कैलास पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी: विधानसभेत दिलेला शब्द पाळावा, वर्ग-दोन जमिनीच्या शर्तभंग प्रश्नावर तात्काळ कार्यवाही करा

आमदार कैलास पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी: विधानसभेत दिलेला शब्द पाळावा, वर्ग-दोन जमिनीच्या शर्तभंग प्रश्नावर तात्काळ कार्यवाही करा
धाराशिव, ता. 11: भोगवाटादार वर्ग-दोनच्या जमिनींचे वर्ग-एकमध्ये रुपांतर करताना शर्तभंगचा नजराणा फक्त एकदाच आकारला जावा, या संदर्भात हिवाळी अधिवेशनात दिलेल्या आश्वासनाची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे तातडीने आदेश निर्गमित करावेत, अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

आमदार कैलास पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना यासंदर्भात पत्र दिले असून, त्यात त्यांनी स्पष्ट केले आहे की, 17 डिसेंबर 2024 रोजी विधानसभेत इनाम जमिनीच्या मदत माश प्रकारातील भोगवाटादार वर्ग-दोनच्या जमिनीचे वर्ग-एकमध्ये रूपांतर करण्यासंदर्भातील विधेयक मांडण्यात आले होते. या विधेयकावरील चर्चेदरम्यान, जर एखाद्या जमिनीचे हस्तांतर अनेक वेळा झाले असेल, तर प्रशासनाने शर्तभंगच्या मुद्द्यावर नजराणा प्रत्येक वेळेस आकारला जात असल्याची अडचण लक्षात आणून दिली होती.

सभागृहात दिलेले आश्वासन पाळण्याची मागणी

विधानसभेतील चर्चेदरम्यान आमदार कैलास पाटील यांनी ही शर्तभंग नजराणा फक्त एकदाच आकारला जावा, अशी मागणी केली होती. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात स्पष्ट आश्वासन दिले होते की, शर्तभंग कितीही वेळा झाला असला तरी नजराणा फक्त पाच टक्केच आकारला जाईल आणि जमीन वर्ग-एकमध्ये रुपांतरित करण्यात येईल.

मात्र, या निर्णयावर अद्याप महसूल विभागाने कोणतीही कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे आमदार कैलास पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे विनंती केली आहे की, सभागृहात दिलेल्या आश्वासनानुसार तातडीने महसूल विभागास आदेश द्यावेत आणि संबंधित शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.

शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आणि नाराजी

या निर्णयाच्या प्रतीक्षेत अनेक शेतकरी आणि भोगवाटादार आहेत. सरकारने दिलेला शब्द पाळावा आणि निर्णय लवकर अंमलात आणावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या मागणीवर काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement