धाराशिव |
दरोडा, जबरी चोरी, मोटरसायकल व डिझेल चोरीसारख्या एकूण 17 गंभीर गुन्ह्यांमध्ये पोलिसांना पाहिजे असलेला कुख्यात आरोपी मोतीराम उर्फ कुक्या बादल शिंदे (रा. मोहा, ता. कळंब, जि. धाराशिव) यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.
दिनांक 25 जून 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि सुदर्शन कासार व त्यांचे पथक धाराशिव जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्याच्या तसेच फरार आरोपींच्या शोधाच्या कामगिरीवर होते. त्याचदरम्यान त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आरोपी मोतीराम शिंदे हा काही कामानिमित्त धाराशिव शहराकडे येत आहे.
सदर माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वरुडा पुलाजवळ सापळा रचून आरोपीस शिताफीने अटक केली. आरोपीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा तपास केला असता, धाराशिव, लातूर, बीड व अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये त्याच्याविरोधात पाच दरोडे, एक जबरी चोरी, एक दरोड्याचा प्रयत्न, तसेच दहा मोटरसायकल व डिझेल चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले. अनेक दिवसांपासून तो तपासी अधिकाऱ्यांना चकवा देत होता.
स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यतत्परतेमुळे अखेर ‘कुक्या’ पोलिसांच्या जाळ्यात अडकला असून पुढील कारवाईसाठी त्याला ग्रामीण पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर व अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सपोनि सुदर्शन कासार तसेच पोहेका शौकत पठाण, जावेद काझी, प्रकाश औताडे, फरहान पठाण, चापोका नितीन भोसले व रत्नदीप डोंगरे यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.
0 Comments