Ad Code

Responsive Advertisement

धाराशिव: मारहाणीच्या घटनेनंतर परस्पर विरोधी गुन्हे दाखल

धाराशिव: मारहाणीच्या घटनेनंतर परस्पर विरोधी गुन्हे दाखल

धाराशिव शहरात दोन दिवसांपूर्वी झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर आता दोन्ही पक्षांकडून परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.
माजी नगरसेवक रोहित निंबाळकर, मंगेश भुजबळ आणि पृथ्वीराज पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी धाराशिव शहरातील शांती निकेतन परिसरात एका दुकानात मारहाणीची घटना घडली होती. या घटनेनंतर काल माजी नगरसेवक रोहित निंबाळकर यांनी विजय राठोड आणि आकाश तावडे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.

तर आज विजय राठोड यांनी प्रत्युत्तरादाखल माजी नगरसेवक रोहित निंबाळकर, मंगेश भुजबळ आणि पृथ्वीराज पाटील यांच्याविरोधात फिर्याद दिली आहे.

विजय राठोड यांच्या फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे —
३० ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री सुमारे नऊ वाजता, मी पृथ्वीराज पाटील यांच्या ‘शिवशक्ती एंटरप्रायजेस’ या दुकानात जाऊन माझ्या पत्नीशी छेडछाड का केले, असे विचारले असता आमच्यात वाद झाला. तेथे उपस्थित रोहित निंबाळकर आणि मंगेश भुजबळ यांनी माझ्याशी शिवीगाळ करून अॅल्युमिनियमच्या पट्टीने माझ्यावर हल्ला केला.
भांडण सोडवण्यासाठी आलेल्या सुरेश पवार यांनी हस्तक्षेप केला, मात्र आरोपींनी माझ्यावर बाहेर येऊनही हल्ला सुरूच ठेवला.
त्यांनी मला आणि आकाश तावडे यांना दहा ते पंधरा दिवसांत जीव घेण्याची धमकीही दिली.
हल्ल्यात माझ्या डोक्यात आणि हातावर जखमा झाल्याने माझे मित्र शांताराम लोंडे, संदेश जाधव, बबलू गाढवे आणि भाऊ अरुण राठोड यांनी मला लाईफ लाईन हॉस्पिटल, धाराशिव येथे उपचारासाठी दाखल केले.
सध्या मी शुद्धीवर असून उपचार सुरू आहेत. आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मी केली आहे.

या फिर्यादीनुसार आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

दरम्यान, शहरात निवडणुकीचे वातावरण तापलेले असताना या घटनेने राजकीय चर्चेला उधाण आले आहे. मात्र, या घटनेचा राजकारणाशी काहीही संबंध नसल्याचे भाजप शहराध्यक्ष अमित शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement