पोलिसाच्या घरावर दरोडा ; दरोडेखोरांच्या मारहाणीत महिला जखमी
उस्मानाबाद : उस्मानाबाद तालुक्यातील येडशी गावात पोलिसाच्या घरी दरोडा टाकून वृध्द महिलेस जबर मारहाण करीत दरोडेखोरांनी सोन्याच्या दागिन्यासह १ लाख ३३ हजार रुपयाचा मुद्देमाल लुटून नेला, ही घटना सोमवारी ( दि . १६ ) रात्री घडली . याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की , येडशी येथील समर्थ नगर भागात पोलीस कर्मचारी बळीराम बेद्रे यांचे घर आहे . ते आपल्या पत्नीसह बार्शी येथे राहतात तर त्यांची वृद्ध आई द्वारका तुकाराम बेद्रे ( वय ५५ ) येडशी येथील घरी एकट्यात राहतात .
सोमवारी रात्री त्या झोप येत नसल्याने भजन करीत होत्या . दरम्यान रात्री १२.४५ वाजेच्या सुमारास त्यांच्या घराच्या दाराची कडी- कोयंडा तोडल्याचा आवाज आला . त्यांनी दरवाजाकडे धाव घेतली व दरवाजा आतून दाबून धरला . दरोडेखोरांनी बाहेरून जोराचा धक्का दिल्याने त्या खाली पडल्या व दार उघडले . यावेळी हातात कटावणी व दांडके घेतलेल्या ६ दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला . बेद्रे यांनी आरडाओरड करताच दरोडेखोरांनी डोक्यात तसेच खांद्यावर जबर मारहाण केली . घरातील वेगवेगळ्या खोलीकडे जाऊन त्यांनी साहित्य अस्ताव्यस्त फेकत शोधाशोध केली . लोखंडी कपाट तोडून कपाटातील ७४ ग्रॅमचे सोन्याचे दागिने घेवून पलायन केले . त्याची किंमत अंदाजे १ लाख ३३ हजार रुपये आहे . दरोडेखोरांच्या मारहाणीत द्वारका बेद्रे या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी उस्मानाबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे . उपविभागीय पोलीस अधिकारी अंजूम शेख , ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश साबळे , सहायक पोलीस निरीक्षक योगेश शिंदे यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला , स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह ठसे तज्ञांनीही घटनास्थळी भेट देवून पाहणी केली . श्वान पथकही घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते . याप्रकरणी द्वारका बेद्रे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरूध्द उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे . या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक योगेश शिंदे हे करीत आहेत .
0 Comments