धाराशिव: येरमाळा पोलीस ठाणे हद्दीतील वडगाव येथे 7 फेब्रुवारी 2025 रोजी दिवसा घरफोडीचा प्रकार घडला होता. रामभाऊ गहिनीनाथ नवले शेतातील दैनंदिन कामासाठी गेले असताना, अज्ञात इसमाने त्यांच्या घराचे कुलूप तोडून 15,79,600 रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केली होती. येरमाळा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि सुदर्शन कासार आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा शोध घेतला. तपासात सुरज दादासाहेब शिनगारे (रा. शेलगाव, ता. कळंब, जि. धाराशिव) याचे नाव समोर आले. अधिक चौकशी केल्यावर आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आणि चोरीसंबंधी सर्व माहिती दिली.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीकडून 18 तोळे सोन्याचे दागिने, 40,000 रुपयांची रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण 15,09,600 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. आरोपीला पुढील कारवाईसाठी येरमाळा पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सुदर्शन कासार, सपोफौ वलीउल्ला काझी, पोलीस हवालदार शौकत पठाण, प्रकाश औताडे, फहरान पठाण, मपोह शैला टेळे, पोअं योगेश कोळी, चालक रत्नदिप डोंगरे, नितीन भोसले यांच्या पथकाने केली.
0 Comments