तुळजापूर : तुळजापुरात विक्रीसाठी आणलेले एमडी ड्रग्स स्थानिक गुन्हे शाखा व तामलवाडी पोलिसांच्या संयुक्त कारवाईत जप्त करण्यात आले. या कारवाईत तिघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून 10.75 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तामलवाडी पोलिसांना अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि सुदर्शन कासार व पथक तुळजापूर उपविभागात गस्त घालत होते. यावेळी गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की काही इसम मुंबईहून तुळजापुरात एमडी ड्रग्स विक्रीसाठी आणणार आहेत. मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तामलवाडी पोलिसांच्या मदतीने सोलापूर-तुळजापूर महामार्गावर गस्त वाढवली.
टोल नाक्यावर कारवाई
तामलवाडी टोल नाक्याच्या पुढे तुळजापूरच्या दिशेने एक मोटार कार संशयास्पदरीत्या उभी असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. पोलिसांनी कारची तपासणी केली असता त्यात तीन इसम आढळले. चौकशी दरम्यान त्यांनी कारमध्ये एमडी अमली पदार्थ असल्याची कबुली दिली. त्यांनी हे ड्रग्स मुंबईहून तुळजापुरात विक्रीसाठी आणल्याचे सांगितले.
10.75 लाखांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी तात्काळ पंचनामा करत 59 पुड्या एमडी ड्रग्स (किंमत 2.50 लाख रुपये), गुन्ह्यात वापरलेली मोटार कार आणि मोबाईल असा एकूण 10.75 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ताब्यात घेण्यात आलेले इसम म्हणजे अमित उर्फ चिमू अशोकराव आरगडे व युवराज देविदास दळवी (दोघेही राहणार तुळजापूर) आणि संदीप संजय राठोड (राहणार नळदुर्ग) अशी आहेत.
पुढील कारवाईसाठी तिघांना पोलिसांच्या ताब्यात
तिघांनाही पुढील कारवाईसाठी तामलवाडी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून, स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि सुदर्शन कासार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन व पथकाची कामगिरी
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि सुदर्शन कासार, तामलवाडी पोलीस ठाण्याचे सपोनि गोकुळ ठाकूर, पोलीस उपनिरीक्षक लोंढे, पोलीस हवालदार शौकत पठाण, प्रकाश औताडे, फहरान पठाण, जावेद काझी, चालक रत्नदीप डोंगरे, नितीन भोसले तसेच तामलवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार माने, सलगर, सुरनर, चौगुले, चालक शेख यांच्या पथकाने महत्वपूर्ण भूमिका बजावली.
0 Comments