धाराशिव | समाजातील सर्वसामान्य घटकांना न्याय मिळावा, त्यांचे प्रश्न मार्गी लागावेत, आणि त्यांना प्रशासनाकडून सहकार्य मिळावे, यासाठी अहोरात्र झटणारे नाव म्हणजे धनंजय (नाना) शिंगाडे. कोणताही राजकीय वारसा नसतानाही समाजसेवेच्या बळावर त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्याचा वेध घेतला असता, समाजासाठी समर्पित असलेल्या एका लढवय्या नेत्याचा प्रवास उलगडतो.
उपेक्षितांमधून नेतृत्वाची जडणघडण
धाराशिव शहरातील भीमनगर येथे एका सामान्य कुटुंबात जन्मलेले धनंजय शिंगाडे यांनी लहानपणापासूनच सामाजिक विषमतेचे चटके सोसले. जातीय तणाव, आर्थिक विषमता आणि प्रशासनाकडून होणारा अन्याय यामुळे ते व्यथित होत. याच भावनेतून त्यांनी समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्याचा संकल्प केला. शालेय जीवनापासूनच सामाजिक चळवळीचे बीज त्यांच्या मनात रुजले, आणि आज त्याच चळवळीने भव्य स्वरूप धारण केले आहे.
राजकारणासोबत समाजकारणाचा वसा
सामाजिक कार्यातून त्यांनी लोकांचे विश्वास संपादन केले आणि त्याच बळावर नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती यांसारख्या स्थानिक राजकारणात प्रभावी सहभाग नोंदवला. मोठमोठे राजकीय पक्ष निवडणुकीदरम्यान त्यांचा सल्ला घेतात, उमेदवार निवडीत त्यांच्या मतेला महत्त्व दिले जाते, हेच त्यांच्या कार्याचे प्रमाणपत्र आहे. विधानसभा निवडणुकीसाठी त्यांना अनेकदा उमेदवारीची संधी देऊ करण्यात आली, मात्र त्यांनी पक्षनिष्ठेपेक्षा सामाजिक बांधिलकीला प्राधान्य दिले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार
धाराशिव शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, यासाठी धनंजय शिंगाडे यांनी सातत्याने लढा दिला. आंदोलने, निवेदने आणि नगरपरिषदेच्या सभेत पाठपुरावा केल्यानंतर अखेर पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला, जो आज शहराची शान बनला आहे.
सांस्कृतिक चळवळीत योगदान
शहरातील नाट्य व सांस्कृतिक चळवळीला चालना देण्यासाठी त्यांनी गंगाधर करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन सुरू केले. त्यांच्या दिवंगत वडिलांच्या नावाने होणाऱ्या या स्पर्धेला संपूर्ण राज्यभरातून स्पर्धक सहभागी होतात. त्यांचे बंधू विशाल शिंगाडे, सुपुत्र प्रसेनजीत शिंगाडे आणि त्यांचे सहकारी हे कार्य पुढे नेत आहेत.
जातीय सलोखा व सामाजिक एकजुटीचा प्रयत्न
जातीय दंगली किंवा समाजात निर्माण होणारे तणाव यावर शांतता प्रस्थापित करण्याचे काम प्रशासनाच्या आधी धनंजय शिंगाडे करतात. कोणत्याही परिस्थितीत लोकांना समजावत, संविधानिक मार्गाने प्रश्न सोडविण्यावर भर देत त्यांनी सामाजिक सलोख्याला जपले आहे.
बहुजन योद्धा संघटना – अन्यायाविरोधातील बुलंद आवाज
समाजातील उपेक्षित घटकांना न्याय मिळावा, त्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवला जावा, यासाठी त्यांनी ‘बहुजन योद्धा’ संघटनेची स्थापना केली. या संघटनेने अल्पावधीतच प्रभावी कार्य करून सर्व स्तरातील बहुजन समाजाला एकत्र आणले आहे.
शेतकऱ्यांच्या न्यायहक्कांसाठी लढा
धाराशिव महसूल प्रशासनाने 12,500 एकर जमीन शेतकऱ्यांच्या ताब्यातून घेण्याचा प्रयत्न केला. धनंजय शिंगाडे यांनी या अन्यायाविरुद्ध रस्त्यावर उतरून आंदोलन छेडले. मंत्र्यांपासून ते मंत्रालयापर्यंत पाठपुरावा करून त्यांनी हा प्रश्न मार्गी लावला.
नागरिकांच्या समस्यांसाठी सदैव तत्पर
शहर आणि ग्रामीण भागातील नागरी समस्या सोडवण्यासाठी धनंजय शिंगाडे सदैव तत्पर असतात. भविष्यातही आपल्या कार्याचा हा वारसा पुढे चालू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
समाजकारण आणि संघर्षाचा अविरत प्रवास करणाऱ्या धनंजय (नाना) शिंगाडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
0 Comments