धाराशिव : शहरातील वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला अष्टविनायक चौक ते बाबर चौक हा १५ मीटर डीपी रोड अखेर हॉट मिक्स डांबरीकरणासाठी तयार झाला आहे. या रस्त्याचे काम अनेक दिवसांपासून रखडले होते. मात्र, मा. आमदार कैलास पाटील यांनी या कामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिल्यानंतर या रस्त्याच्या विकासाला चालना मिळाली.
या रस्त्याच्या मधोमध MSEB चे पोल आणि डीपी (डिस्ट्रीब्युशन पॉईंट) असल्याने डांबरीकरणाचे काम अडथळ्यात आले होते. हे पोल शिफ्ट करणे हे तांत्रिकदृष्ट्या जिकिरीचे काम होते. परंतु, स्थानिक समाजसेवक प्रशांत (बापू) साळूंके यांनी यावर विशेष लक्ष केंद्रीत करत, सातत्याने पाठपुरावा, संबंधित यंत्रणांवर आंदोलन आणि संवाद करून हे पोल हटवण्यास भाग पाडले. नवीन पोल उभारण्यात आले असून आता रस्ता मोकळा झाला आहे. त्यामुळे हॉट मिक्स डांबरीकरणाचा मार्ग आता सुकर झाला आहे.
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी समाजसेवक बापू साळूंके यांच्यावर हल्ला झाला होता. या हल्ल्यात त्यांच्या पायावर गंभीर इजा होऊन शस्त्रक्रिया करण्यात आली होती. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना दोन महिन्यांचा विश्रांतीचा काळ दिला गेला आहे. तरीसुद्धा त्यांनी घरातूनच या कामावर लक्ष ठेवून, सतत पाठपुरावा करत हे काम पूर्णत्वास नेले. "इच्छा असेल तर कोणतेही काम अशक्य नसते," हे त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले.
या संदर्भात बोलताना बापू साळूंके यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले, "शहरासाठी काम करत राहणार आहे, अडथळे आले तरी थांबणार नाही. नागरिकांची गैरसोय दूर होणं, हेच माझं ध्येय आहे."
धाराशिव शहरातील नागरिकांनी देखील बापू साळूंके यांच्या कार्याची दखल घेत त्यांचे आभार मानले असून, या रस्त्याचे लवकरच हॉट मिक्स डांबरीकरण पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
0 Comments