धाराशिव - येडशी अभयारण्यात टिपेश्वर येथून आलेल्या वाघाच्या धुमाकूळाने लोकांच्या मनात अजूनही धडकी भरलेली असताना, तुळजापूर तालुक्यातील नंदगाव आणि धाराशिव तालुक्यातील सांगवी येथे दिसलेला आणखी एक वाघ चर्चेचा विषय ठरला आहे. वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगवी परिसरात आढळलेला प्राणी वाघच असल्याचे स्पष्ट केले असून, तो देखील टिपेश्वर येथून आल्याचे म्हटले जात आहे. मात्र, दुसरीकडे बार्शी तालुक्यात देखील टिपेश्वरचा वाघ असल्याचे सांगितले जात असल्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे.
वनविभाग माहिती लपवत असल्याचा आरोप
सध्याच्या परिस्थितीकडे पाहता धाराशिव जिल्ह्यात दुसऱ्या वाघाची एन्ट्री झाल्याची शक्यता बळावते आहे. येडशी अभयारण्यात वास करणारा वाघ जर प्रत्यक्ष तुळजापूर तालुक्यात आढळला असेल, तर नागरी व ग्रामीण भाग तसेच दोन राष्ट्रीय महामार्ग ओलांडून त्याचा प्रवास शक्य आहे का, असा प्रश्न स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत. या पार्श्वभूमीवर वनविभाग माहिती लपवत असल्याचा आरोप होत आहे.
प्रत्यक्षदर्शीची तब्येत बिघडली
सोमवारी (दि. १६ जून) सांगवी शिवारात वाघ दिसल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली असून, भक्तराज दहीभाते यांनी वाघ पाहिल्यानंतर घबराटीने त्यांची तब्येत खालावली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या ते अस्वस्थ आहेत. या पार्श्वभूमीवर आरोग्यविभाग आणि वनविभागाने त्यांच्यावर समुपदेशन व योग्य उपचार करावेत, अशी मागणी होत आहे.
वाघाचा वस्तीत प्रवेश – मॅन हिटरचा धोका?
सांगवी येथून रेल्वे लाईन ओलांडून वाघ जागजी परिसरात गेला असून तिथे त्याने एका प्राण्याची शिकार केल्याचे काही नागरिकांनी सांगितले. वाघाचा वारंवार वस्त्यांमध्ये वावर पाहता तो मॅन हिटर असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे वनविभागाने तात्काळ सावधगिरी बाळगून योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे.
२० दिवसांची डेडलाइन, अन्यथा आंदोलन
सध्या शेतकरी शेतीच्या कामासाठी शेतात मुक्काम करत असल्याने वाघाच्या हल्ल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वनविभागाने नव्या वाघाचा बंदोबस्त अतीतातडीने करावा, अन्यथा २० दिवसांच्या आत कुठलीही पूर्वसूचना न देता, पूर्वी स्थगित केलेले आंदोलन पुन्हा सुरू करण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते मनोज जाधव यांनी दिला आहे.
0 Comments