शेख जाफरोद्दीन रब्बानी (युवा मशाल प्रतिनिधी )
धाराशिव (२५ जून २०२५): पार्वती हॉस्पिटल, धाराशिव येथे दिनांक २४ जून २०२५ रोजी रात्री १०:३० वाजता अज्ञात व्यक्तींकडून अचानक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात रुग्णालयाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, वैद्यकीय यंत्रणा आणि इतर संरचनात्मक साधनसामग्रीचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अहवालात समोर आले आहे.
या धक्कादायक घटनेचा इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) धाराशिव शाखेने तीव्र निषेध नोंदवला आहे. हल्ल्याच्या निषेधार्थ आणि डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी, IMA धाराशिवने २५ जून २०२५ रोजी (बुधवार) तातडीच्या सेवा वगळता इतर सर्व वैद्यकीय सेवा २४ तासांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
IMA धाराशिवचे अध्यक्ष डॉ. महेश कनाडे, इतर सदस्यांनी या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. त्यांनी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
या प्रकारामुळे वैद्यकीय व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
0 Comments