धाराशिव (प्रतिनिधी) –
धाराशिव शहरातील सार्वजनिक ठिकाणी उभारलेल्या मुताऱ्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. अस्वच्छता, तोडफोड, दुर्गंधी आणि कचऱ्याचा सडा यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. स्वच्छतेसाठी ठेकेदार नेमले असतानाही, नगर परिषदेच्या देखरेखीअभावी ही गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
शहरातील समता कॉलनीतील मुतारी अत्यंत अस्वच्छ असून पाणी नाही, भिंती तुटलेल्या आहेत आणि प्रचंड दुर्गंधी पसरलेली आहे. R P कॉलेजच्या बाजूची मुतारी अर्धवट चालू अवस्थेत असून नळ बंद आणि आजूबाजूला कचरा साचलेला आहे. बसस्थानक परिसरातील मुतारी दुरुस्तीसाठी बंद असून फ्लश बंद आणि अंधार असल्याने ती वापरास असुरक्षित आहे. आर्य समाज मंदिरासमोरील मुतारी पाणीटंचाई व कचऱ्याच्या ढिगामुळे अत्यंत अस्वच्छ अवस्थेत आहे. तर बाजारपेठेतील माऊली चौक मध्यभागातील मुतारी तोडफोड झालेली असून भिंती तुटलेल्या व स्वच्छतेचा पूर्ण अभाव आहे.
नगर परिषदेकडे वारंवार तक्रारी नोंदवल्यानंतरही प्रत्यक्ष पाहणी आणि स्वच्छतेसाठी आवश्यक पावले उचलली गेली नाहीत. ठेकेदारांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्याकडून कामाचा हिशोब घेण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
अस्वच्छतेमुळे डेंग्यू, कॉलरा, टायफॉइडसारख्या आजारांचा प्रादुर्भाव होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ विशेष स्वच्छता मोहीम राबवून दोषी ठेकेदारांवर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.
धाराशिवकरांना आता केवळ आश्वासन नव्हे, तर प्रत्यक्ष कार्यवाहीची प्रतीक्षा आहे.
0 Comments