वाशी (शहाबाज काझी प्रतिनिधी)– गेल्या काही दिवसांपासून मांजरा नदीवर आलेल्या महापुरामुळे जाणकापुर गावाचा बाहेरील संपर्क पूर्णपणे तुटला होता. पाण्याने वेढलेल्या गावातील नागरिक अन्नधान्य आणि पाण्याच्या टंचाईमुळे मोठ्या संकटात अडकले होते. भीती, चिंता आणि अस्वस्थतेने भारलेल्या या दिवसांमध्ये ग्रामीणांची स्थिती खूपच गंभीर होती.
या संकटाची दखल घेत वाशी महसूल विभागाने मानवतेचे खरे कर्तव्य पार पाडले. तहसीलदार प्रकाशजी म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी बीड जिल्ह्यातून तब्बल १५ किमी लांब असलेल्या बांध रस्त्याचा धाडसी मार्ग शोधत पुढे सरसावले. अडथळ्यांना न जुमानता ट्रॅक्टरमधून अन्नधान्य व पाणी गावापर्यंत पोहोचवण्यात आले.
आज दुपारी जेव्हा मदत जाणकापुरात पोहोचली, तेव्हा गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य आणि डोळ्यांत दाटलेले आनंदाश्रू हे त्या कार्याचे खरे यश ठरले. गावकरी फक्त दिलासा मिळाल्याने नव्हे, तर प्रशासनाच्या मदतीने नव्या आशेचा किरण दिसल्याने आनंदित झाले.
महसूल विभागाचे हे काम फक्त मदतकार्य नाही, तर मानवीतेचा आदर्श आणि प्रशासनाच्या कर्तव्यनिष्ठेचे जिवंत उदाहरण आहे. गावकऱ्यांनी महसूल विभागाच्या अधिकार्यांचे मनापासून आभार मानले व त्यांना शुभेच्छा दिल्या.
तहसीलदार प्रकाशजी म्हेत्रे म्हणाले, “आपण आपल्या नागरिकांसाठी नेहमीच तत्पर आहोत. अशा प्रसंगी मानवतेची सेवा हा आपला प्राथमिक कर्तव्य आहे. जनतेच्या चेहऱ्यावर हास्य पाहणे हेच आमच्यासाठी सर्वात मोठे समाधान आहे.”
महसूल विभागाचे हे धाडसी आणि सहानुभूतिपूर्ण कार्य गावकऱ्यांच्या मनात दीर्घकाळ स्मरणात राहणार आहे.
0 Comments