धाराशिवमध्ये IMD कडून रेड अलर्ट; मुसळधार पावसाची शक्यता
धाराशिव, दि. 26 सप्टेंबर –
भारतीय हवामान विभागाने (IMD) धाराशिव जिल्ह्यासाठी पुढील काही तासांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. या काळात जोरदार ते मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून, नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नद्या-नाले तुडुंब भरून वाहण्याचा धोका आहे. पूरस्थिती निर्माण होऊ शकते, त्यामुळे नागरिकांनी शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे, सुरक्षित स्थळी थांबावे आणि धोकादायक घर किंवा इमारतींपासून दूर राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
अनेक ठिकाणी रस्ते बंद होण्याची शक्यता असून, विशेषतः रात्रीच्या वेळी प्रवास टाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नदी-नाल्याच्या ठिकाणी पूरस्थिती असल्याने कोणीही या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करू नये, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
धाराशिव जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा सजग आणि दक्ष असून, संबंधित विभागांना सतर्क राहण्याच्या सूचना आधीच देण्यात आल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापन पथके, पोलीस, महसूल आणि आरोग्य विभाग सतत तयारीत आहेत.
नागरिकांनी प्रशासनाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. हवामान विभागाच्या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर काळजी घेणे हेच सुरक्षिततेचे साधन ठरणार आहे.
0 Comments