वाशी प्रतिनिधी : शहाबाज काजी
गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे वाशी तालुक्यात महापूर आला आणि शेकडो कुटुंबांचे संसार अक्षरशः पाण्यात वाहून गेले. घरातील अन्नधान्य, कपडे, भांडी या सर्व जीवनावश्यक वस्तूंचे मोठे नुकसान झाले. घरदार उद्ध्वस्त झाल्याने नागरिकांच्या डोळ्यांत हताशेचे अश्रू होते, उद्याचा दिवस कसा निभावून न्यायचा याचीच चिंता सर्वांसमोर उभी राहिली होती.
अशा कठीण प्रसंगी आमदार तानाजी सावंत यांनी मदतीचा हात पुढे करत साठे नगर भागातील पूरग्रस्तांना अन्नधान्याच्या किट वाटल्या. “कुटुंबाच्या पोटाला आधार मिळावा” या उद्देशाने दिलेल्या या मदतीने नागरिकांच्या चेहऱ्यावर दिलासा उमटला.
या उपक्रमावेळी भैरवनाथ शुगर लिमिटेडचे संचालक केशव सावंत, शिवहार स्वामी, नागनाथजी नाईकवाडी, सतीश आबा शेरकर, विकास तळेकर व ॲड. सत्यवान गपाट यांच्या सह शिवसैनिक उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी स्वतःहून नागरिकांच्या हाती किट सोपवत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
जनतेच्या वतीने केशव सावंत यांच्या समोर मांडण्यात आलेल्या मागण्या :
1. पूरग्रस्त कुटुंबांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी.
2. घरांचे पंचनामे करून लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी.
3. शेतकऱ्यांना बियाणे, खत व शेतीसाठी विशेष पॅकेज जाहीर करावे.
4. घरदार उद्ध्वस्त झालेल्यांसाठी पुनर्बांधणी योजना हाती घ्यावी.
5. साठे नगर परिसरातील लहान पुलांची उंची वाढवून मोठ्या नळ्या बसवाव्यात जेणेकरून भविष्यात अशी भीषण परिस्थिती उद्भवणार नाही.
स्थानिक नागरिकांनी आमदार तानाजी सावंत आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले असून, शासन व प्रशासनाकडूनही या मागण्यांवर तातडीने निर्णय घेऊन पूरग्रस्तांच्या जिवनात स्थैर्य आणण्याची अपेक्षा व्यक्त केली.
0 Comments