मुंबई, दि. ३ ऑक्टोबर : (शेख जाफरोद्दीन रब्बानी)
महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागामार्फत राज्यातील २४५ नगरपरिषद व १४५ नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांच्या आरक्षण सोडतीची तारीख निश्चित करण्यात आली आहे. ही महत्त्वाची सोडत सोमवार, दिनांक ६ ऑक्टोबर २०२५ रोजी मंत्रालय, मुंबई येथील परिषद सभागृहात पार पडणार असल्याचे शासनाकडून जाहीर करण्यात आले आहे.
नगरविकास विभागाच्या आदेशानुसार, या सोडतीसाठी राज्यातील सर्व राजकीय पक्षांना सूचना देण्यात आल्या आहेत. सोडतीच्या वेळी सुरक्षेच्या कारणास्तव मंत्रालयात प्रवेश मर्यादित ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाला केवळ दोन प्रतिनिधींना उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाणार आहे. संबंधित पक्षांचे अध्यक्ष किंवा सचिव यांनी या दोन प्रतिनिधींची शिफारस करून शासनाला कळवावी, अशी विनंती करण्यात आली आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नगराध्यक्ष पदांसाठी आरक्षण निश्चित करण्याच्या या प्रक्रियेकडे सर्वच राजकीय पक्षांचे तसेच स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे. आगामी निवडणुकांपूर्वी नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित होणे हा राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा टप्पा मानला जातो.
ही माहिती शासनाच्या नगरविकास विभागाच्या उपसचिव प्रियंका कुलकर्णी-छापवाले यांनी प्रसिद्ध केलेल्या आदेशाद्वारे देण्यात आली आहे.
0 Comments