वाशी प्रतिनिधी :
वाशी तालुक्यातील नागरिक गेल्या अनेक दशकांपासून शासनाच्या उदासीनतेचा बळी ठरत आहेत. वाशी ते पिंपळगाव व वाशी ते दसमेगाव हे दोन प्रमुख रस्ते आजही पूर्ण डांबरीकरणाची वाट पाहत आहेत. तब्बल ३० वर्षांपासून फक्त ठिगळे लावून डागडुजी करण्यात येते, पण कायमस्वरूपी सुविधा मिळालेल्या नाहीत.
आज राज्यातील बहुतांश अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण पूर्ण झालेले असताना, वाशी तालुक्याच्या या महत्त्वाच्या मार्गांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्यामुळे लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
अलीकडील अतिवृष्टीने तर या रस्त्यांची दुर्दशा अधिकच गंभीर केली आहे. खोल खड्ड्यांनी व्यापलेल्या रस्त्यांमुळे वाहतूक धोकादायक बनली असून, दररोज नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि रुग्णांना प्रचंड हाल सोसावे लागत आहेत. एखादी आपत्कालीन परिस्थिती आली तरी रुग्णवाहिका किंवा इतर वाहनांना वेळेवर पोहोचणे जवळपास अशक्य ठरत आहे.
रोजच्या प्रवासात धोका पत्करावा लागतो, गाड्यांची दुरुस्ती करावी लागते, अपघातांचे प्रमाण वाढले आहे – हे सर्व नागरिकांच्या जगण्यावर घाव घालत आहे. गावोगावी लोकांना असे वाटते की, वाशी तालुक्याचा विकासाच्या नकाशावरून जणू काही विसर पडलेला आहे.
खाजा पाशा उर्फ बाबा रफिक कुरेशी यांनी स्पष्टपणे सांगितले की, “शासन व लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे अजूनही डोळेझाक केली तर नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याशिवाय पर्याय उरणार नाही.”
त्यांनी शासनाला आर्त विनंती केली आहे की, वाशी–पिंपळगाव आणि वाशी–दसमेगाव हे रस्ते तातडीने डांबरीकरण करून तालुक्याला कायमस्वरूपी दिलासा द्यावा. शासनाने तातडीने जागे होऊन या प्रश्नाचे निराकरण करावे, अशी जनतेची व त्यांच्या वतीने खाजा पाशा उर्फ बाबा रफिक कुरेशी यांची ठाम मागणी आहे.
0 Comments