धाराशिव (प्रतिनिधी):
धाराशिव जिल्ह्यात गेल्या आठवडाभरात तीन वेगवेगळ्या ठिकाणी पोलीस असल्याचे भासवून नागरिकांची फसवणूक केल्याच्या सलग घटना घडल्या आहेत. सणासुदीच्या काळात अशा प्रकारच्या गुन्ह्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, आता पोलीस प्रशासनासमोर या भामट्यांना पकडण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
जिल्ह्यात यापूर्वीही अशा घटना घडल्या असून, आता पुन्हा वाढत्या प्रमाणात या फसवणुकीच्या प्रकरणांनी नागरिकांना हादरवले आहे. अनेक नागरिकांचे म्हणणे आहे की, “भामट्या पोलिसांनी आता ओरिजनल पोलिसांनाच आव्हान दिलं की काय?” असा प्रश्न जनतेतून उपस्थित होत आहे.
🔹 धाराशिव शहरातील घटना :
फिर्यादी प्रभुलिंग प्रतयाप्पा राजुरे (वय 62, रा. गणेशनगर, झेंडा क्र. 2, धाराशिव) हे दि. 16 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी सुमारे 11.30 वाजता एस.टी. गॅरेजजवळ, साठे चौकासमोर असताना दोन अज्ञात व्यक्ती मोटारसायकलवर आले. त्यांनी “आम्ही पोलीस आहोत, तुमची चौकशी करायची आहे” असे सांगत राजुरे यांच्या खांद्यावर हात ठेवला आणि “तुमच्या हातातील अंगठी तपासणीसाठी काढा” असे सांगून 5 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी (किंमत सुमारे ₹40,000) हातोहात फसवणुकीने घेतली.
या घटनेवरून धाराशिव शहर पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम 204, 319(2), 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
🔹 उमरगा येथील घटना :
फिर्यादी शशिकांत रुद्रप्पा चनपटने (वय 66, रा. कसगी, ता. उमरगा) हे दि. 19 ऑक्टोबर रोजी दुपारी सुमारे 3.10 वाजता गुलबर्गा–उमरगा चौरस्ता रोडवर, प्रज्ञा पेपर कंपनीजवळ असताना दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांना थांबवत “आम्ही पोलीस आहोत” असे खोटे सांगितले. त्यांनी “तुमचे दागिने तपासणीसाठी द्या, पुढे गेल्यावर परत देऊ” असे सांगून 4 तोळ्याचे सोन्याचे कडे व 5 ग्रॅम वजनाची अंगठी (किंमत ₹4,43,000) घेऊन बुलेट मोटारसायकलवर पळ काढला.
या प्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम 319(2) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
🔹 ढोकी येथील घटना :
फिर्यादी प्रमोद नेमिनाथ बिडकर (वय 76, रा. शिराढोण, ता. कळंब) हे दि. 21 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.45 वाजता ढोकी पेट्रोल पंप–गोवर्धनवाडी रस्त्याने जात असताना एका अनोळखी व्यक्तीने स्वतःला पोलीस अधिकारी सांगितले. त्याने आयडी कार्ड दाखवून “तुमच्याकडील दागिने तपासायचे आहेत” असे सांगून दिशाभूल केली. त्यानंतर दोन तोळ्याची सोन्याची चैन आणि 7 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी घेऊन तो पसार झाला.
या प्रकरणी ढोकी पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम 318(4) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments