धाराशिव : धाराशिव शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी मंजूर झालेल्या निधीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सोशल मीडियावर तीव्र शाब्दिक युद्ध रंगले आहे. #हीच_तुझी_लायकी या हॅशटॅगखाली दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर टीका करण्यात येत असून, राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
अलीकडेच धाराशिव शहरातील रस्ते विकास कामांवरील स्थगिती उठल्याची घोषणा महायुतीचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी पत्रकार परिषदेत घोषणा केली होती. त्यांच्या या घोषणेनंतर शहरभरात “स्थगिती उठली” अशा आशयाचे मोठमोठे बॅनर आणि पोस्टर लावण्यात आले.
मात्र, विरोधाभास असा की, स्थगिती उठल्याची घोषणा महायुतीच्या आमदारानं केली असतानाच, दोन दिवसांनंतर पुन्हा त्याच महायुतीच्या सरकारमधील मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी या कामांवर पुन्हा एकदा स्थगिती आणली. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, या प्रकरणाने आता सोशल मीडियावर तीव्र वादळ निर्माण केले आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियावर पुढीलप्रमाणे पोस्ट शेअर केली आहे —
> “लाडक्या कंत्राटदाराला टक्केवारीसाठी वीस महिने धडपडून काम मिळवून दिलं. म्हणून तुझ्याच फडणवीस सरकारने त्या कामाला स्थगिती दिली. #हीच_तुझी_लायकी”
तर दुसरीकडे भाजपच्या कार्यकर्त्यांकडून त्याला प्रत्युत्तर म्हणून अशी पोस्ट प्रसिद्ध करण्यात आली आहे —
> “पक्षप्रवेश करतो असं सांगून पालकमंत्र्याकडे भीक मागून धाराशिवचा विकास निधी थांबवण्याचा प्रयत्न करणारा, #हीच_तुझी_लायकी”
या परस्पर विरोधी पोस्टमुळे धाराशिव शहरातील राजकारणात तणाव निर्माण झाला असून, विकासकामांवर राजकीय संघर्षाचा परिणाम दिसून येत आहे.
दरम्यान, धाराशिवकर नागरिकांनी मात्र याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. “सत्ताधारी आणि विरोधकांच्या भांडणामुळे शहरातील विकासकामे ठप्प झाली आहेत. आता या राजकीय खेळाला ब्रेक लागावा आणि कामे सुरू व्हावीत,” अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
धाराशिवकरांचा एकच सूर – ‘राजकारण थांबवा, विकास सुरू करा!’
0 Comments