उस्मानाबाद जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष पवन राजेनिंबाळकर यांची ३ जून २००६ मध्ये कळंबोली येथे हत्या झाली होती . या प्रकरणी माजी खासदार डॉ . पद्मसिंह पाटील यांच्यासह नऊ जणांवर सीबीआयमार्फत गुन्हा दाखल होऊन आरोपपत्र झाले . हा खटला मुंबईच्या सत्र न्यालयात सुरू आहे . या प्रकरणातील आरोपी क्रमांक चार पारसमल ताराचंद जैन यांनी न्यायालयात माफीचा साक्षीदार म्हणून साक्ष देण्यासाठी अर्ज दाखल केला होता .
सदर अर्ज न्यायालयाने मंजूर केल्यानंतर मागील बऱ्याच तारखेपासून माफीचा सक्षीदार पारसमल जैन यांची मुंबईतील सत्र न्यायालयात साक्ष नोंदविण्यात आली . ६ ऑक्टोबर २०२१ रोजी तारीख होती . या दिवशी माफीचा साक्षीदार पारसमल जैन याने सर्व आरोपींची ओळख न्यायालयास पटवून दिली . मात्र त्यावेळी आरोपी क्रमांक एक डॉ . पद्मसिंह पाटील गैरहजर होते . डॉ. पाटील यांच्या वकीलामार्फत ते आजारी असल्याचे कारण सांगून मुदत मागितली . मात्र फिर्यादी श्रीमती आनंदीदेवी पवन राजेनिंबाळकर यांनी नेमलेल्या खाजगी वकिलांनी डॉ . पाटील आजारी नसून ते अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाच्या पहाणी करीता विविध ठिकाणी हजर असल्याचे व कार्यक्रमास हजेरी लावत असल्याचे फेसबुक पोस्टद्वारे दिसून येत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले . तसेच डॉ . पाटील आजारी असल्याचे कारण दाखवून न्यायालयात हजर राहण्याचे टाळत असल्याचे निदर्शनास आणून दिले ६ ऑक्टोबर रोजी डॉ . पाटील यांच्या वतीने न्यायालयात हजर राहण्यास मुदत मिळण्याच्या अर्जावर मुंबईच्या सत्र न्यायालयाने डॉ . पाटील यांनी पुढील तारखेस म्हणजे १३ ऑक्टोबर रोजी हजर रहावे अन्यथा अटक वॉरंट काढण्यात येईल , असा आदेश केला आहे .
0 Comments