साधू असल्याचे भासवून ४० हजारास लुटले ! उस्मानाबाद शहरातील घटना
उस्मानाबाद : बँक ग्राहकास दोन भामट्यांनी रस्त्यात गाठून २० पाऊले चालण्यास सांगत ४० हजाराची रोकड लुटल्याने मोठी खळबळ उडाली आहे . उस्मानाबाद शहरात बसस्थानकसमोर वर्दळीच्या ठिकाणी ही घटना घडली . याप्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात बुधवारी ( दि .१ ) गुन्हा नोंद करण्यात आला आहे .
जिल्ह्यात बँक ग्राहकांच्या फसवणुकीचे सत्र सुरूच आहे . त्यामुळे पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या महाठगांच्या मुसक्या आवळाव्यात , अशी मागणी होत आहे
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की , उस्मानाबाद तालुक्यातील देवळाली येथील रहिवाशी नामदेव महादेव सुर्यवंशी हे सोमवारी ( दि .२ ९ ) कामानिमित्त उस्मानाबाद येथे आले होते . दरम्यान , त्यांनी स . ११.३० वाजेच्या सुमारास शहरातील स्टेट बँक ऑफ इंडीयाच्या शाखेतून ४० हजार रुपये काढले . ही रक्कम एका बॅगमध्ये घेवून ते शहरातील बसस्थानकातील रस्त्याने जात होते . दरम्यान , अज्ञात दोन व्यक्तींनी सुर्यवंशी यांना रस्त्यातच गाठले . यावेळी त्या दोन व्यक्तींनी ' हम हरीद्वारसे आये है , तुम हमे पैसे मत देना , सिर्फ अगरबत्ती का पुडा दे दो असे म्हणत सुर्यवंशी यांना हटकले . ते दोघे साधु असल्याचा समज झाल्याने सुर्यवंशी यांनी त्यांना अगरबत्तीचा दुकानातून विकत आणुन दिला . त्यानंतर त्या दोघांनी सुर्यवंशी यांना बोलण्यात गुंतवून ठेवले व त्यांची हॅन्डबॅग आपल्याकडे घेतली . सुर्यवंशी यांना विश्वासात घेवून २० पाऊले जावून परत या असे सांगितले . त्या दोघांची कसलीही खातरजमा न करता सुर्यवंशी यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून २० पाऊले चालत जावून परत आले . दरम्यान , त्या दोघा भामट्यांनी सुर्यवंशी यांची हॅन्डबॅग घेवून पलायन केले . त्यात बँकेतून काढलेली सुर्यवंशी यांची ४० हजार रुपयाची रोकड होती . आपली फसवणूक झाल्याचे लक्षात सुर्यवशी यांनी आनंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून फिर्याद दिली . त्यावरून अज्ञात भामट्याविरूध्द फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे .
0 Comments