प्रतिनिधी | धाराशिव
शहरातील प्रमुख रस्त्यांवर तसेच बसस्थानक परिसरात विनाकारण थांबून विद्यार्थिनींची छेडछाड करणाऱ्या रोडरोमियोंचा हैदोस दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शाळा आणि महाविद्यालयात जाणाऱ्या मुलींना या त्रासाला रोज सामोरे जावे लागत असून, पोलीस प्रशासन मात्र केवळ दर्शनी उपाययोजना करत आहे. त्यामुळे पालक आणि विद्यार्थिनींत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
धाराशिव शहरातील तांबरी आणि खाजा नागर परिसरात असलेल्या महाविद्यालय आणि शाळांमध्ये दररोज शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी येतात विद्यार्थिनींची वर्दळ असते. मात्र, या परिसरात काही युवकांनी रस्त्यांवर उभे राहत मुलींची छेडछाड करणे, अश्लील शेरेबाजी करणे, तसेच पाठलाग करणे हे प्रकार सुरूच ठेवले आहेत.
धाराशिव बसस्थानक परिसरातही ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थिनींना याच प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अशा घटनांमुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पोलीस प्रशासनाने या समस्येची दखल घेत ‘छेडछाड प्रतिबंधक पथक’ स्थापन केले असले, तरी हे पथक केवळ काही ठराविक ठिकाणीच फिरते. प्रत्यक्षात छेडछाड करणाऱ्यांवर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचे चित्र आहे.
विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाने त्वरित आणि कठोर पावले उचलण्याची मागणी पालक आणि नागरिकांकडून केली जात आहे. अन्यथा, रस्त्यावरचा हा त्रास अधिक गंभीर स्वरूप धारण करू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
0 Comments