धाराशिव : दिनांक 20 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2025 दरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे धाराशिव जिल्ह्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. वार्षिक सरासरी 603.10 मि.मी. पावसाच्या तुलनेत यावर्षी आतापर्यंत तब्बल 771.4 मि.मी. म्हणजेच 139% पावसाची नोंद झाली असून, फक्त आजच्या दिवसातच 65 मि.मी. पाऊस कोसळला आहे.
जीवितहानी व नुकसान
अतिवृष्टीमुळे एकूण 22 ठिकाणी घटनेची नोंद झाली आहे. यामध्ये एक व्यक्तीचा मृत्यू झाला असून 21 जनावरे दगावली आहेत. तसेच अंशतः 48 घरांचे नुकसान झाले आहे.
कृषीक्षेत्रातील प्रचंड फटका
या पावसामुळे 92 गावे बाधित झाली असून, 64,029 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये जिरायती क्षेत्र 62,985 हेक्टर, बागायती क्षेत्र 4 हेक्टर आणि एककमी क्षेत्र 0 हेक्टरचा समावेश आहे. प्राथमिक अहवालानुसार एकूण 62,989 हेक्टर क्षेत्र पावसामुळे बाधित झाले आहे.
धरनस्थिती
जिल्ह्यातील 1 मोठा प्रकल्प (अनसूर नाळ प्रकल्प) तसेच 17 मध्यम प्रकल्पांपैकी 4 प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. यामध्ये रेणा, रूई, खापरखेडा आणि सांगवी प्रकल्पांचा समावेश आहे. तर 208 लघुप्रकल्पांपैकी 88 प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत.
नैसर्गिक आपत्ती व पुरस्थिती
अतिवृष्टीमुळे धाराशिव जिल्ह्यातील भूम, परंडा, वाशी तालुक्यांत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. 20 सप्टेंबरपासून सतत मुसळधार पाऊस होत असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
भूम तालुक्यातील अंदाजे 140 मोटे जनावरे पाण्यात वाहून गेल्याचे प्राथमिक अहवालात नमूद आहे. तर 39 गावातील 307 कुटुंबांचे 1,209 नागरिक सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहेत.
भूम तालुक्यातील लाखी गावात 6 कुटुंबे, रुई येथे 7 कुटुंबातील 28 नागरिकांना हेलिकॉप्टरच्या साहाय्याने सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.
याशिवाय भूम तालुक्यात 5 ठिकाणी बचावकार्य सुरू असून अनेक ठिकाणी नागरिकांना सुरक्षित करण्यासाठी NDRF व आर्मीची टीम कार्यरत आहे.
बचावकार्य
परंडा तालुक्यात घाटपिंपरी, वागेगव्हाण, वडनेर येथे अनेक नागरिक अडकले असून त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी NDRF व आर्मीची टीम कार्यरत आहे.
भूम तालुक्यातील 12 ठिकाणी बोटींच्या साहाय्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.
जिल्हा प्रशासनाकडून 35 बोटींच्या माध्यमातून बचावकार्य हाती घेण्यात आले आहे.
परंडा तालुक्यात अंदाजे 150 ते 200 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम सुरू आहे.
भूम तालुक्यात 40 कुटुंबे अडकले असून त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.
जिल्हा प्रशासन, एनडीआरएफ आणि आर्मी या तिन्ही यंत्रणांनी युद्धपातळीवर काम सुरू केले आहे. तसेच धाराशिव जिल्हाधिकारी यांच्यासह विविध अधिकाऱ्यांनी पूरग्रस्त भागाला भेट देऊन स्थितीचा आढावा घेतला आहे. नागरिकांना प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
0 Comments