Ad Code

Responsive Advertisement

वाशी शहरातील साठेनगर पाण्यात बुडाले – नागरिकांचे हाल, प्रशासनाची धावपळ

वाशी शहरातील साठेनगर पाण्यात बुडाले – नागरिकांचे हाल, प्रशासनाची धावपळ

वाशी (शहाबाज काझी)
वाशी तालुक्यातील पावसाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. दिनांक 18 सप्टेंबर 2025 ते 19 सप्टेंबर 2025 सकाळपर्यंत तब्बल 220 मिमी पावसाची नोंद झाली. या पावसामुळे साठेनगर परिसरात अनेक घरे पाण्यात बुडाली.

नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने धान्य, कपडे, भांडी, घरगुती साहित्य यांचे मोठे नुकसान झाले. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण या संकटामुळे त्रस्त झाले आहेत. काही कुटुंबे तर उघड्यावर येऊन थांबली आहेत.

या परिस्थितीची दखल घेऊन माननीय तहसीलदार प्रकाशजी म्हेत्रे, वाशी नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष सुरेश कवडे, शिंदे गटाचे नेते शिवहार स्वामी व नागजी बापू नाईकवाडी यांनी साठेनगर भागाची पाहणी केली. त्यांनी नागरिकांचे निवेदन स्वीकारून, ही गंभीर स्थिती शासनापर्यंत पोहोचवण्याचे व तातडीने मदत करण्याचे आश्वासन दिले.

स्थानिक नागरिकांनी पाहणीदरम्यान तक्रार केली की, साठेनगर भागातून जाणारा जो पूल आहे, तो लहान बांधण्यात आला असून त्यामध्ये केवळ छोट्या नळ्या टाकण्यात आल्यामुळे पाठीमागील पाणी अडून बसले व घरात घुसले. त्यामुळेच ही भीषण परिस्थिती निर्माण झाली. म्हणूनच नागरिकांनी तो पूल पाडून नवीन व मोठा पूल करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.

या कठीण प्रसंगात प्रशासनाने तीन कुटुंबांना पर्यायी राहण्याची व्यवस्था करून देण्याचे आश्वासन दिले. मात्र अजूनही अनेक कुटुंबे असुरक्षित अवस्थेत आहेत. नागरिकांनी शासनाने तातडीने मदत करावी, अन्नधान्य, वस्त्र व राहण्याची सोय करावी, अशी आर्त मागणी केली आहे.
महिलांनी प्रशासन समोर मांडल्या व्यथा
“आमचं घर, आमचं अन्न, आमचे कपडे – सगळं पाण्यात गेलं. मुलांना खायला नाही, झोपायला जागा नाही. शासनाने तातडीने मदत करावी,” असा आवाज साठेनगरातून उमटत आहे.

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement