Ad Code

Responsive Advertisement

“मांजरा नदीच्या पुरात जेबा गावाचे शेतकरी हवालदिल – पीक, घर आणि आधार नष्ट”

“मांजरा नदीच्या पुरात जेबा गावाचे शेतकरी हवालदिल – पीक, घर आणि आधार नष्ट”
वाशी तालुका प्रतिनिधी :
शहाबाज काझी 
जेबा गावात मांजरा नदीला आलेल्या महापुराने शेतकऱ्यांचे आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त केले आहे. गावातील शेतकरी गणेश शेषेराव बोराङे यांचे दोन एकर पीक – सोयाबीन आणि कांदा – महापुराच्या पाण्यात वाहून गेले. वर्षभर घाम गाळून उभे केलेले पीक एका दिवसात पाण्यात मिसळले, आणि त्यांचा संसार उध्वस्त झाला. गणेश यांच्या चेहर्‍यावर फक्त चिंता, वेदना आणि हताशेचं प्रतिबिंब दिसतं.

गणेश यांच्यावर आधीच बॅक ऑफ महाराष्ट्र, पारगाव शाखेचं १ लाख रुपयांचं कर्ज आहे. त्यातच दोन वर्षांपूर्वी आई-वडिलांचं निधन झाल्यामुळे घरातील आधार हरपला. आता पीक नष्ट, कर्जाचा ओझा आणि घरकुल सांभाळण्याची जबाबदारी – या तिन्ही संकटांमध्ये गणेश पूर्णपणे हवालदिल झाले आहेत. ते म्हणतात, “संपूर्ण वर्षभर मेहनत घेतली, पण पाण्याने आम्हाला शून्यात सोडले आहे; आता काय करू, कुणाला सांगू?”

पूराच्या पाण्यामुळे शेतजमिनी चिखलाने भरल्या आहेत, घराभोवती पाणी साचलं आहे, आणि दैनंदिन जीवनही अत्यंत कठीण झालं आहे. गावातील शेतकरी घाम गाळून उभे केलेलं पीक पाहून केवळ हताश होतात, आणि प्रत्येकाच्या डोळ्यांतून वेदना व आक्रोश स्पष्ट दिसतो.

शेजारी शेतकरी सांगतात, “गणेशचं पीक तर वाहून गेलं, पण आमचंही काही वेगळं नाही. हातातलं धान्य नाही, घरातलं अन्न संपत आलंय. मुलांना दोन वेळच्या जेवणासाठी पण चिंता करावी लागते. आता सरकारनंच मदत केली नाही, तर उद्या मुलांनाही दोन घास देणं अशक्य होईल.”

गावातील महिला म्हणतात, “घरातलं धान्य, कपडे, भांडी-पातेली पाण्यात गेली. मुलांना दुधासाठीसुद्धा पैसे उरले नाहीत. प्रत्येकाने घरातील मूलभूत गोष्टींची चिंता सुरू केली आहे. सरकारनं लक्ष द्यायला हवं, नाहीतर आमचं जगणं पूर्णपणे अशक्य होईल.”

पूरग्रस्त शेतकऱ्यांनी शासनाकडे तातडीने मदत, कर्जमाफी आणि नुकसान भरपाई मागितली आहे. “आज आम्ही संकटात आहोत. सरकारनं जर मदतीचा हात दिला नाही, तर उद्या आमचं जगणं अशक्य होईल…” – जेबा गावातील शेतकऱ्यांचा आर्त आक्रोश ह्या शब्दांतून उमटतो

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement