धाराशिव, दि. 14 ऑक्टोबर :
धाराशिव नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीची राजकीय चुरस वाढत असताना, AIMIM पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते जावेद शेख यांनी प्रभाग क्रमांक 4 मधून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पक्षात आणि स्थानिक राजकारणात त्यांच्या सक्रियतेमुळे या प्रभागातील वातावरण रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.
जावेद शेख हे AIMIM पक्षाचे जुन्या आणि प्रामाणिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाच्या विचारधारेचा प्रसार करत स्थानिक पातळीवर संघटन बांधणीसाठी सातत्याने काम केले आहे. त्यामुळे त्यांना कार्यकर्त्यांमध्ये तसेच नागरिकांमध्ये चांगली ओळख आणि विश्वास प्राप्त झाला आहे.
प्रभाग क्रमांक 4 मध्ये जावेद शेख यांचा दांडगा जनसंपर्क आणि मजबूत नागरिकांशी संवाद आहे. सामाजिक तसेच राजकीय उपक्रमांमध्ये ते नेहमी अग्रभागी दिसतात. नागरिकांच्या छोट्या-मोठ्या समस्या सोडविण्यापासून ते सार्वजनिक उपक्रमांमध्ये सहभाग घेण्यापर्यंत, त्यांनी प्रभागातील लोकांसोबत जवळचे नाते जपले आहे.
विशेष म्हणजे, या प्रभागातील तरुण वर्गाचा मोठा पाठिंबा त्यांना मिळत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. युवकांच्या माध्यमातून त्यांनी AIMIM पक्षाचा जनाधार वाढविण्यासाठी प्रयत्न केले आहेत.
पक्षाच्या आतल्या चर्चांनुसार, AIMIM पक्ष यावेळी जावेद शेख यांना प्रभाग क्रमांक 4 मधून उमेदवारी देऊ शकतो, अशी जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
धाराशिव शहरातील AIMIM च्या संघटनात्मक मजबुतीत जावेद शेख यांचे योगदान लक्षात घेता, त्यांना उमेदवारी मिळाल्यास या प्रभागात रंगतदार सामना होणार हे निश्चित आहे.
0 Comments