Ad Code

Responsive Advertisement

"धाराशिव जिल्ह्यात वाघ पुन्हा सक्रिय; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण"

तब्बल दोन महिन्यांनंतर वाघ पुन्हा सक्रिय; कोरेगावमध्ये गायीवर हल्ला, वन विभाग सतर्क
धाराशिव :
धाराशिव व बार्शी तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून थैमान घालणाऱ्या वाघाने तब्बल दोन महिन्यांच्या शांततेनंतर पुन्हा एकदा आपली उपस्थिती दाखवली आहे. बार्शी तालुक्यातील कोरेगाव परिसरात वाघाचे दर्शन झाल्याने पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे, मागील दोन महिन्यांपासून या वाघाचा कुठलाही ठावठिकाणा लागत नव्हता तसेच या दरम्यान पाळीव प्राण्यांवर हल्ल्यांचे प्रमाणही शून्यावर आले होते. त्यामुळे वाघाचा वावर नेमका कुठे आहे, याबाबत वन विभागासह स्थानिक जनतेत संभ्रमाचे वातावरण होते.

वन्य प्राण्यांवर शिकारी करून राहिला लपून

प्राथमिक माहितीनुसार, या काळात वाघाने जंगलातील रानडुक्कर, हरण यांसारख्या वन्य प्राण्यांवर शिकारी करून आपला उदरनिर्वाह केला. त्यामुळे त्याच्या हालचाली बाहेर व्यक्त न होता तो जंगलातच लपून राहिला. मात्र, गेल्या पाच ते सहा दिवसांपूर्वी कोरेगाव गावात वाघाने एका गायीवर हल्ला चढविल्याची घटना समोर आल्याने त्याच्या हालचाली पुन्हा एकदा प्रकाशझोतात आल्या आहेत. यामुळे सध्या वाघ बार्शी तालुक्यातच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

वन विभाग सतर्क, विशेष पथक सज्ज

वाघाच्या या हालचालीनंतर वन विभागाने तात्काळ सतर्कतेचा इशारा दिला आहे. वाघाने पुन्हा पाळीव प्राण्यांवर किंवा मानवावर हल्ला टाळण्यासाठी वन विभागाने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. वाघाला जेरबंद करण्यासाठी जंगल परिसरात पिंजरे लावले जाणार असून, ट्रॅकिंग यंत्रणा सक्रिय करण्यात येणार आहेत. तसेच ड्रोनच्या माध्यमातून वाघाच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे. वाघ पकडण्यासाठी विशेष पथकही तातडीने कार्यरत ठेवण्यात येणार असल्याचे वन विभागाने जाहीर केले आहे.

शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

वाघाच्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर कोरेगावसह परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी वर्गाने आपल्या गुराढोरांची सुरक्षिततेसाठी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन वन विभागाने केले आहे. तसेच, जंगल परिसरात किंवा एकट्याने वावर टाळावा व कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तातडीने वन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

वाघ पकडण्यासाठी जिल्ह्याचे लक्ष

या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वाघ पकडण्याच्या मोहिमेकडे लागले आहे. वाघाला सुरक्षितपणे जेरबंद करण्यासाठी वन विभागाच्या प्रयत्नांना लवकरच यश मिळेल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement