अपूर्ण बस स्थानकाचे उद्घाटन : कामाची घाई, गुणवत्तेचा बळी?
धाराशिव | प्रतिनिधी
धाराशिव शहरातील नव्या बस स्थानकाचे उद्घाटन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले असतानाही, काम अपूर्ण असतानाच उद्घाटनाची घाई सुरू झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. धाराशिवचे पालकमंत्री आणि राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते 1 मे 2025 रोजी दुपारी 1 वाजता या स्थानकाचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती त्यांच्या दौऱ्यादरम्यान देण्यात आली आहे.
मात्र प्रत्यक्षात, स्थानकाच्या मुख्य इमारतीचे काम जरी पूर्ण झाले असले तरी, रंगरंगोटी व वरवरच्या देखभालीशिवाय मोठी कोणतीही तयारी झालेली नाही. स्थानकाच्या दोन्ही बाजूंच्या रस्त्यांचे काम अद्याप रखडलेले असून, केवळ मुख्य प्रवेशद्वाराजवळील रस्ता युद्धपातळीवर पूर्ण केला जात आहे – तोही उद्घाटनाच्या कॅमेऱ्यासाठी! एका बाजूच्या रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी गेट बंद करून वीस दिवस झाले तरी काम पूर्ण झालेले नाही.
“हे उद्घाटन आहे की दिखावा?” असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. स्थानिक व्यापारी संघटनांनीही चिंता व्यक्त करत म्हटले आहे, “बस स्थानक नागरिकांच्या दैनंदिन प्रवासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. जर केवळ तात्पुरत्या देखभालीसाठी लाखो रुपये खर्च केले जात असतील आणि खऱ्या गरजा दुर्लक्षित केल्या जात असतील, तर ही जनतेच्या अपेक्षांची थट्टा आहे.”
कामावर घाई केली जात असल्याने गुणवत्तेवर थेट परिणाम होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. काही ठिकाणी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याचे आरोपही होत आहेत. सार्वजनिक निधीचा असा अपव्यय म्हणजे जनतेच्या विश्वासाला तडा देण्यासारखे आहे, अशी तीव्र टीका सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
या संपूर्ण प्रकरणावर स्थानिक प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही. मात्र, मंत्र्यांच्या कार्यालयात उद्घाटनाच्या तयारीला चांगलाच वेग आला आहे.
नागरिकांची मागणी आहे की, “प्रकल्प पूर्ण झाल्यानंतरच उद्घाटन करावे. अधुरी कामे दाखवून जनतेला गाफील ठेवणे थांबवावे.”
उद्घाटनाचा जल्लोष महत्त्वाचा असेलही, परंतु त्याहून अधिक महत्त्वाचे आहे – नागरिकांसाठी स्थायिक, सुरक्षित आणि दर्जेदार सुविधा निर्माण करणे. केवळ फीत कापण्यासाठी झालेली घाई, अखेर शहरवासीयांच्या स्वप्नांवर पाणी फेरणार का? या प्रश्नाचे उत्तर प्रशासन व राजकीय नेत्यांना द्यावेच लागेल.
-
0 Comments