धाराशिव, दि. ५ एप्रिल २०२५ - राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या पारदर्शक कारभाराला काहींच्या 'राजकीय काविळे'ने ग्रासले आहे. पालकमंत्री झाल्यापासून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांना खोडा घालण्याचा प्रयत्न एका तत्कालीन स्वीय सहाय्यकाने सुरू केला आहे. या व्यक्तीने केवळ एक दिवस स्वीय सहाय्यक म्हणून काम केले होते, परंतु ऑर्डर रद्द झाल्याने त्याच्या मनातील खदखद बाहेर पडत असून, बदनामीसाठी 'श्रद्धा' पॅटर्नचा नवा बेत आखला आहे.
पालकमंत्री सरनाईक यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सन २०२४-२५ साठी वाढीव निधी मंजूर करून आणला. धाराशिव, तुळजापूर, कळंब, भूम, परंडा, वाशी, उमरगा आणि लोहारा या तालुक्यांना कोट्यवधी रुपयांचा निधी देऊन विकासाला चालना दिली. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा विचार करून निधी वाटपात समतोल राखला. मात्र, या सर्व घडामोडींमुळे अस्वस्थ झालेल्या एका तत्कालीन पीएने पालकमंत्री, माजी आमदार, ओएसडी आणि इतर सहाय्यकांच्या प्रतिमेला धक्का लावण्यासाठी चुकीच्या चर्चांना हवा देण्यास सुरुवात केली आहे.
या तत्कालीन पीएची ऑर्डर काढल्यानंतर त्याचे अनेक 'काळे कारनामे' समोर आल्याने ती तात्काळ रद्द करण्यात आली. यामुळे हिरमोड झालेल्या या व्यक्तीने बदनामीचे जाळे विणण्यास सुरुवात केली. स्वतः रंगविलेल्या खोट्या चर्चांचे सादरीकरण करत तो पालकमंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहे. विशेष म्हणजे, या व्यक्तीने यापूर्वी एका पालकमंत्र्यांकडे असताना 'टोल' गोळा करून संपत्ती जमवल्याची चर्चा वरिष्ठ स्तरावर झाली होती, ज्यामुळे त्याला स्वीय सहाय्यक पद मिळाले नाही, असेही म्हटले जाते.
जिल्ह्यातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि जनता या तत्कालीन पीएच्या कृतींना चांगलेच ओळखून आहेत. स्वीय सहाय्यक पद न मिळाल्याच्या रागातून तो पालकमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांवर शिंतोडे उडवत असल्याची चर्चा आहे. मात्र, त्याचे हे षडयंत्र जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात उघड झाले आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी 'श्रद्धा' पॅटर्न राबवणाऱ्या या व्यक्तीला जनता आणि नेते ओळखून असून, त्याच्या बदनामीच्या खेळाला आता पूर्णविराम मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
एकदिवसीय पीए ते बदनामीचा मास्टरमाइंड!
या घटनेने धाराशिव जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असून, पालकमंत्री सरनाईक यांच्या विकासकामांना खीळ घालण्याचा हा प्रयत्न असल्याची जोरदार चर्चा आहे.
0 Comments