"तीन नाव , एक आरोपी आणि २०० कोटींचा घोटाळा – जिल्हा पुरवठा विभागाची ‘क्राईम सिरीज’"
धाराशिव | प्रतिनिधी
जिल्हा पुरवठा विभागातील २०० कोटींच्या अन्नधान्य घोटाळ्याने जिल्ह्यात खळबळ उडवली आहे. हर्षद मेहता, तेलगी यांसारख्या गाजलेल्या वेब सिरीजलाही मागे टाकणारी ही खरीखुरी कहाणी सध्या ‘रिअल लाईफ थ्रिलर’ ठरत आहे. तांदूळ अफरातफर प्रकरणात "आरोपी एक, पण चेहेरे तीन" असा प्रकार समोर आला आहे. अखिल, अलीम आणि सलीम शेख – या तिघांच्या नावाभोवती संशयाचे वादळ आहे.
३० मार्च रोजी कर्जत येथून पोलिसांनी अखिल शेख याला अटक केली. गुन्हा अलीम शेख याने केल्याचे प्रथमदर्शनी समोर आले होते, मात्र तो अल्पवयीन असल्याने अखिल शेखला ‘मुखवटा आरोपी’ म्हणून पुढे करण्यात आल्याची चर्चा आहे. यामध्ये एका स्थानिक बड्या व्यक्तीच्या खडी क्रशरवरील वाहन व चालकाचीही सांगड घातली जात आहे.
ढोकी पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विलास हजारे यांनी अलीम अल्पवयीन नसल्याचे स्पष्ट केले असले, तरी पुरवठा विभागातील काही अधिकाऱ्यांनी तपासाला चकवा देण्यासाठी जबाबांमध्ये गोंधळ निर्माण केला आहे. आता सत्य पोलिस तपासातूनच स्पष्ट होणार आहे.
---
जीपीएस शिवाय ट्रान्सपोर्ट – घोटाळ्याची मूळ गुरफट
या प्रकरणात ट्रकवर GPS नसणे ही मुख्य बाब ठरत आहे. कंत्राटदाराकडून जीपीएस शिवाय खासगी वाहने वापरली गेल्याचा आरोप आहे. संनियंत्रण कक्षामध्ये योग्य देखरेख न केल्यामुळे अवैध वाहतूक करून धान्य काळ्या बाजारात विकले जात असल्याचे उघड होत आहे. शासनाच्या कंत्राटात नाव असलेल्या गाड्यांऐवजी अन्य वाहने वापरून बक्कळ नफा मिळवला गेला – आणि हेच २०० कोटींच्या घोटाळ्याचे मूळ आहे.
रेकॉर्डही गायब – १००० कोटींच्या घोटाळ्याचा इशारा
दैनिक जनमतने उघडकीस आणलेल्या वृत्तमालिकेमुळे विभागाची दैना उडाली आहे. अनेक रेशन दुकानांचे युनिट रजिस्टर मेन्टेन नसल्याची माहिती समोर येत असून, यामुळे घोटाळ्याचा आकडा १००० कोटींच्या पुढे जाऊ शकतो. अधिकाऱ्यांच्या वरदस्तीनं काळ्या बाजारात धान्य पाठवले जात असल्याचीही शक्यता आहे.
आज न्यायालयात सादर – पुढील दिशा ठरणार
आज दिनांक ७ एप्रिल रोजी आरोपीला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. न्यायालय पोलिस तपासाला कोणती दिशा देते, पुरवठा विभागातील भ्रष्ट कारभाराकडे कसे पाहते, यावरच पुढील कारवाई अवलंबून आहे.
शेवटी प्रश्न एकच — ही 'क्राईम सिरीज' थांबणार कधी आणि कोण देणार न्याय?"
-
0 Comments