धाराशिव, ता. 17 जुलै :
धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरात बीडीजी गेम, दमन गेम व टी.सी. गेम या ऑनलाईन गेमच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना अधिक पैशांचे आमिष दाखवत आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश सायबर पोलिसांनी केला आहे. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून आणखी तीन आरोपींचा शोध सुरू आहे. सायबर गुन्ह्याविरोधातील ही महत्त्वपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक सौ. रितू खोखर व अप्पर पोलीस अधीक्षक सौ. शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे.
आरोपींच्या मुसक्या आवळल्या
सायबर पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक ए. एच. चोरमले, सहायक पोलीस निरीक्षक कासुळे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने कळंब तालुक्यातील तडवळे गावात छापा टाकला. त्यावेळी उत्तरेश्वर दामोधर इटकर (वय 45, रा. सोनेसांगवी, केज, जि. बीड) व अस्लम दस्तगीर तांबोळी (वय 32, रा. शेळका धानोरा, कळंब) हे दोन इसम ऑनलाईन जुगार खेळवताना आढळले. त्यांच्याकडून तपासाअंती असे स्पष्ट झाले की, व्हॉट्सॲपच्या माध्यमातून ते नागरिकांना गेमची लिंक पाठवत होते व कमी पैशात अधिक कमाईचे आमिष दाखवत होते.
गेम लिंकद्वारे फसवणूक
बी.डी.जी., दमन व टी.सी. गेम या ऑनलाईन गेम्सच्या लिंक नागरिकांना पाठवून त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर लॉगिन आयडी व पासवर्ड दिला जात होता. गेममध्ये पैसे लावून जास्तीचे पैसे मिळण्याचे भासवले जात होते. आरोपींनी व्हॉट्सॲप चॅटिंगद्वारे अनेक लोकांना अशाच प्रकारे फसवले आहे.
फसवणुकीचे नेटवर्क विस्तृत
अटक आरोपींच्या चौकशीत आणखी धक्कादायक माहिती समोर आली असून सुरज घाडगे (रा. सातेफळ, ता. केज, जि. बीड), नामदेव कांबळे (रा. अंबेजोगाई, जि. बीड), व एम. डी. पाटील (रा. नांदेड) या तिघांनी लॉगिन आयडी व पासवर्ड पुरवले असल्याचे निष्पन्न झाले आहे. या तिघांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
कायदेशीर कारवाई
या प्रकरणी सायबर पोलीस ठाणे धाराशिव येथे गुन्हा रजि. नं. १७/२५ नोंदवण्यात आला असून, भारतीय दंड संहिता कलम ३१८(४), ३(५), माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६(क), ६६(ड) तसेच महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागरिकांना सायबर पोलीसांकडून आवाहन
सायबर पोलिसांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून कोणत्याही अनोळखी नंबरवरून आलेली लिंक, QR कोड, किंवा फोन कॉल यावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. बँक खात्याची माहिती, OTP इत्यादी माहिती अजिबात शेअर करू नये. जर कोणताही सायबर गुन्हा घडला असल्यास नागरिकांनी 1930 या हेल्पलाईनवर कॉल करून त्वरित माहिती द्यावी किंवा www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी. तसेच सायबर पोलीस ठाणे, धाराशिव येथे थेट संपर्क साधावा.
कारवाईत सहभागी अधिकारी
ही कारवाई पोनि चोरमले, सपोनि कासुळे, सफौ कुलकर्णी, पोहक. हालसे, मपोना पौळ, पोशि जाधवर, भोसले, मोरे, तिळगुळे, कदम, काझी, शेख, खांडेकर, शिंदे, पुरी, अंगुळे, बिराजदार आणि गाडे यांनी संयुक्तपणे केली.
🛡️ सजग राहा, सायबर फसवणुकीपासून वाचवा!
0 Comments