शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाची राष्ट्रीय स्तरावर दखल; पुरस्कार वितरण सोहळा मुंबईत डॉ. किरण बेदी व सायना नेहवाल यांच्या हस्ते
वाशी (ता. वाशी, जि. धाराशिव) :
जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, पारा (ता. वाशी) येथील विज्ञान विषयाचे आदर्श शिक्षक आयुब शेख सर यांची Indian Talent Olympiad (ITO) तर्फे दिल्या जाणाऱ्या "बेस्ट टीचर अवॉर्ड 2025–26" साठी निवड झाल्याची अत्यंत आनंददायक आणि गौरवाची बातमी आहे.
शेख सर यांनी गेल्या काही वर्षांपासून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाबाबत आत्मीयता निर्माण करण्याचे कार्य केले आहे. प्रयोगशील अध्यापन, नावीन्यपूर्ण उपक्रम आणि विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यावर त्यांचा भर राहिला आहे. त्यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन ITO Olympiad या राष्ट्रीय पातळीवरील संस्थेने त्यांची निवड केली आहे.
या निवडीबाबत त्यांना संस्थेच्या वतीने निवड पत्र तसेच अभिनंदन पत्र प्रदान करण्यात आले आहे. पुरस्कार वितरण सोहळा 9 नोव्हेंबर 2025 रोजी मुंबई येथे पार पडणार असून, या कार्यक्रमात भारताच्या पहिल्या महिला IPS अधिकारी डॉ. किरण बेदी व ऑलिम्पिक विजेती सायना नेहवाल यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
आयुब शेख सर हे अत्यंत कर्तव्यनिष्ठ, परिश्रमी आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा जागवणारे शिक्षक म्हणून ओळखले जातात. त्यांनी विज्ञान विषयाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवले आहेत. त्यांच्या कार्यामुळे संपूर्ण वाशी परिसरात त्यांच्याबद्दल गौरवाची भावना आहे.
या यशाबद्दल विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. मकतब ए सफा चे संचालक हाफिज गौस कुरेशी, शोएब काजी, मिसबा काजी, रईस काजी, तसेच अॅड. मोहंमद महेबुब चाऊस आणि इतर स्थानिक नागरिक व शिक्षकवृंद यांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
0 Comments