वाशी (प्रतिनिधी) – वाशी नगरपंचायतीतील बांधकाम विभागात सुरू असलेल्या गंभीर भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करत संघर्ष लोकशक्ती आघाडीने भ्रष्ट अभियंता गणेश जगदाळे याच्याविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे.
संघर्ष लोकशक्ती आघाडीने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही वर्षांपासून वाशी नगरपंचायतीत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार बोगस बिले, खोट्या नोंदी आणि संगनमताद्वारे केला जात आहे. अभियंता गणेश जगदाळेवर या आर्थिक लूटमारीत आघाडीची भूमिका बजावल्याचा आरोप आहे.
विशेष म्हणजे, मागील दोन वर्षांपासून नगरपंचायतीकडे स्वतंत्र अभियंता पूर्णवेळ उपलब्ध असतानाही, केवळ भ्रष्टाचारासाठीच गणेश जगदाळे याच्याकडे बांधकाम विभागाचा अतिरिक्त चार्ज देण्यात आला असल्याचा गंभीर आरोप संघटनेने केला आहे.
आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, जगदाळे हा प्रत्यक्षात वाशी नगरपंचायतीत येतच नाही. त्याने भूम शहरातच आपला “भ्रष्टाचार केंद्र” उभारले असून, तिथूनच नगरपंचायतीच्या कागदपत्रांवर सह्या करतो. बांधकामस्थळांची पाहणी, तपासणी किंवा प्रत्यक्ष कामांची गुणवत्ता तपासण्याची जबाबदारी पार न पाडता तो केवळ कागदावरचे व्यवहार करतो, असा आरोप करण्यात आला आहे.
याबाबत संघर्ष लोकशक्ती आघाडीने मा. जिल्हाधिकारी यांना रीतसर निवेदन दिले असून, जगदाळे याच्याकडून हा अतिरिक्त चार्ज तात्काळ काढून घेण्याची मागणी केली आहे.
संघर्ष लोकशक्ती आघाडीचे नेते म्हणाले, “गणेश जगदाळे याचा भ्रष्टाचार वाशी नगरपंचायतीसाठी काळा डाग आहे. जनतेच्या पैशांची लूट थांबवण्यासाठी हा लढा अखेरपर्यंत चालू राहील. भ्रष्ट अभियंत्याला पाठीशी घालणाऱ्या व्यवस्थेलाही वठणीवर आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
यासोबतच त्यांनी जनतेला हाक देत म्हटले, “जनतेच्या पैशांची लूट थांबवा, भ्रष्ट अभियंत्याला हाकलून द्या!”
0 Comments