Ad Code

Responsive Advertisement

“धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : चोरीच्या पाच दुचाकी वाहनांसह आरोपी अटकेत”

पाच मोटारसायकलसह आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
धाराशिव : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करून विविध ठिकाणांहून चोरी करण्यात आलेल्या पाच मोटारसायकलींसह एकाला ताब्यात घेतले आहे. जप्त वाहनांची एकूण किंमत अंदाजे 2 लाख 60 हजार रुपये असून, आरोपीला पुढील कार्यवाहीसाठी आनंदनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पोलिस अधीक्षक श्रीमती ऋतु खोखर, अपर पोलिस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांचे मार्गदर्शन आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन खटके, अमोल मोरे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

पथक पेट्रोलिंग करत असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, महादेव उर्फ गगन अरुण शिंदे (वय 22, रा. मस्सा खुर्द, ता. कळंब, जि. धाराशिव) हा इसम चोरीच्या मोटारसायकली मस्सा येथील आपल्या घरासमोर असलेल्या शेडमध्ये ठेवून थांबला आहे. पोलिसांनी त्वरित कारवाई करत त्याला ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर त्याच्याकडे अधिक तपास केला असता, येरमाळा, धाराशिव, ढोकी, तामलवाडी तसेच कर्नाटक राज्यातून एकूण पाच मोटारसायकली चोरी केल्याची कबुली त्याने दिली.

सदर वाहनांवरील चोरीचे गुन्हे येरमाळा, ढोकी, आनंदनगर, तामलवाडी तसेच कर्नाटकातील लाकाल (जि. बादलकोट) येथील पोलीस ठाण्यांत नोंद आहेत. आरोपीकडून दोन पंचांच्या उपस्थितीत सर्व पाच मोटारसायकली जप्त करण्यात आल्या.

ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन खटके, अमोल मोरे, पोलिस हवालदार विनोद जानराव, समाधान वाघमारे, नितीन जाधवर, पोलिस नाईक बबन जाधवर, पोलिस अंमलदार योगेश कोळी, चालक महेबुब अरब, प्रकाश बोईनवाड, विनायक दहीहंडे यांच्या पथकाने केली.

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement