वाशी :- धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुका गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसाने अक्षरशः जलमय झाला असून, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पिकं पाण्यात बुडाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. या पार्श्वभूमीवर समाजसेवक शहाबाज काझी यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन वाशी तालुका तातडीने "ओला दुष्काळग्रस्त" घोषित करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, 14 ऑगस्ट रोजी 47 मि.मी., 15 ऑगस्ट रोजी तब्बल 145 मि.मी. तर 19 ऑगस्टपर्यंत एकूण 954 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. या अतिवृष्टीमुळे शेतं पाण्याखाली गेली असून, पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. काही भागांमध्ये शेतं धरणासारखी दिसत असून, शेतातील रस्ते वाहून गेल्याने शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतात जाणंही कठीण झालं आहे.
पंचनामे करण्यासाठी क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना शेतात पोहोचणं अशक्यप्राय झालं आहे. त्यामुळे पंचनाम्याऐवजी जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयांच्या अहवालावर आधारित सरसकट मदत जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
समाजसेवक शहाबाज काझी यांच्या निवेदनातील तातडीच्या मागण्या अशा आहेत :
वाशी तालुका "ओला दुष्काळग्रस्त" घोषित करावा.
पिकनिहाय सरसकट मदतीची घोषणा करावी.
जिओ-टॅग फोटोची अट शिथिल करावी.
आपत्ती व्यवस्थापन निधीतून तात्काळ दिलासा द्यावा.
तालुका व ग्रामपंचायत स्तरावर तातडीचे मदत केंद्र स्थापन करावे.
"पावसाने शेतकऱ्यांचे स्वप्न भिजवले आहे, रस्ते उद्ध्वस्त झाले आहेत, शेतं धरणासारखी दिसत आहेत. शेतकरी हतबल झाला आहे. शासनाने तातडीने या परिस्थितीकडे लक्ष देऊन दिलासा द्यावा," अशी ठाम मागणी समाजसेवक शहाबाज काझी यांनी केली आहे.
0 Comments