"आंदोलकांसाठी वाटप झालेले रेनकोट माझ्या वतीने नव्हते – खासदार ओमराजे निंबाळकरांचा खुलासा"
मुंबई :मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत आंदोलन सुरु असून लाखो आंदोलक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. मागील काही दिवसांपासून पावसामुळे आंदोलकांची मोठी गैरसोय होत आहे. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्री एका अज्ञात व्यक्तीने आंदोलकांना तब्बल दोन हजार रेनकोटचे वाटप केले.
या घटनेनंतर सोशल मीडियावर "ही मदत धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या वतीने करण्यात आली" असा संदेश जोरदारपणे फिरू लागला. अनेकांनी तो मेसेज शेअर करून ही मदत खासदार निंबाळकर यांनी केल्याचे सांगितले. मात्र या सर्व चर्चेला आज स्वतः खासदार निंबाळकरांनी पूर्णविराम दिला.
खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या अधिकृत ट्विटर (X) अकाऊंटवरून पोस्ट करत स्पष्ट केले की :
"मराठा आरक्षण आंदोलन हे स्वयंस्फूर्तीने चालू असून, मी या आंदोलनासाठी मदत केली असल्याच्या चुकीच्या पोस्ट सोशल मीडियावर पसरवल्या जात आहेत. न केलेल्या कामाचे श्रेय घेण्याची माझी सवय नाही. ज्यांनी खरोखर आंदोलकांसाठी मदत केली आहे, त्यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो."
यामुळे आंदोलकांना मदत करणाऱ्या खऱ्या मदतनिसाचे नाव अद्याप समोर आले नसले तरी त्यांचे कार्य अधिक प्रशंसनीय ठरत आहे. खासदार निंबाळकर यांनी मात्र सोशल मीडियावर फिरणाऱ्या चुकीच्या संदेशांना फेटाळून लावले असून, या माध्यमातून सत्य परिस्थिती स्पष्ट केली आहे.
0 Comments