गरीब मुलांचा घास लाटणाऱ्यांचा काळा कारभार उघड – औसा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची धडक कारवाई; पोषण आहार रॅकेटमागे मोठे संगनमत?
लातूर, दि. 13 (प्रतिनिधी):
गरीब विद्यार्थ्यांचा जीवनदायी घास लाटणारे काळाबाजारू माफिया उघडे पडले आहेत. शासनाकडून शालेय पोषण आहारासाठी दिला जाणारा तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. "सिंघम" म्हणून ओळखले जाणारे औसा उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार चौधरी यांच्या पथकाने धाराशिव जिल्ह्यातील वाहनांवर थेट धडक कारवाई करत काळाबाजार थांबवला.
विद्यार्थ्यांचा हक्क बळकावणाऱ्या या भक्षकांवर कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अशी संतप्त मागणी पालक व जनतेतून होत आहे. समाजाला दिला जाणारा अन्नसाठाच चोरट्या मार्गाने लुटला जात असल्याने हा प्रकार समाजाविरुद्धचा थेट डाका मानला जात आहे.
दोन वर्षांपूर्वीही घोटाळा
धाराशिवमध्ये यापूर्वीही असा प्रकार उघड झाला होता. तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल राठोड यांनी केलेल्या कारवाईत पोषण आहारातील वाहने बीड जिल्ह्यातील ठेकेदाराच्या आदेशावरून अदलाबदल करून वापरल्याचे समोर आले होते. मात्र त्याच वाहनांनी पुन्हा काळाबाजार सुरू केल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
टेम्पो रंगेहात पकडला
अलीकडील कारवाईत औसा पोलिसांनी MH 14 BJ 0786 क्रमांकाचा टेम्पो पोषण आहारातील तांदूळ घेऊन थेट लातूरमधील एका मिलकडे काळ्या बाजारासाठी जाताना पकडला. पण या प्रकरणात फक्त चालकावर कारवाई करून संपूर्ण घोटाळा दडपण्याचा उपद्रवी प्रयत्न सुरू असल्याची जोरदार चर्चा जिल्ह्यात रंगली आहे.
मोठ्या रॅकेटचा सुगावा
विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, या काळ्या खेळात गोडाऊन कीपर, दलाल, मिल चालक, काही मुख्याध्यापक आणि जिल्हा परिषदेतील अधिकारी-कर्मचारी असे अनेक जण संगनमताने सामील असल्याचे धक्कादायक तपशील समोर येत आहेत. उपविभागीय अधिकारी चौधरी यांनी जिल्हा परिषदेतील विभाग, शाळांची नोंदी आणि गोडाऊनचा तपास घेतल्यास राज्यातील सर्वात मोठे पोषण आहार रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे.
जनतेचा संताप
गरीब विद्यार्थ्यांचा घास लुटणाऱ्या माफियांना फक्त चालकापुरते मर्यादित करून वाचवले जाणार नाही, तर संपूर्ण रॅकेट उघडे पाडून दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अन्यथा जनता रस्त्यावर उतरेल, असा इशारा जनतेतून दिला जात आहे.
-
0 Comments