Ad Code

Responsive Advertisement

विद्यार्थ्यांचे अन्न गिळणाऱ्या माफियांचा पर्दाफाश; रिपब्लिकन पक्षाचा इशारा — कठोर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन उभारणार

विद्यार्थ्यांचे अन्न गिळणाऱ्या माफियांचा पर्दाफाश; रिपब्लिकन पक्षाचा इशारा — कठोर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन उभारणार
धाराशिव, ता. 15 (प्रतिनिधी):
जिल्ह्यातील गरीब विद्यार्थ्यांच्या पोटावर घाला घालणारा भीषण भ्रष्टाचार अखेर उघडकीस आला आहे. शासनाने पोषण आहारासाठी दिलेला तांदूळ थेट काळ्या बाजारात विकला जात असल्याचे स्पष्ट झाले असून, हा प्रकार म्हणजे विद्यार्थ्यांच्या हक्कांवरचा डाका असल्याचा गंभीर आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट)ने केला आहे.
दि. 13 सप्टेंबर रोजी औसा तालुक्यात MH-14 BJ 0786 हा ट्रक पोलिसांच्या ताब्यात आला. या ट्रकमधून शालेय पोषण आहारासाठी असलेला तांदूळ काळ्या बाजारात नेला जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. या प्रकारात ठेकेदार, गोडाऊन कीपर, वाहन मालक, चालक यांच्यासोबत काही शाळांचे मुख्याध्यापक आणि जिल्हा परिषदेतील अधिकारी-कर्मचारी यांचे संगनमत असल्याचे उघड झाले आहे.
हा प्रकार समोर आल्यानंतर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून, “विद्यार्थ्यांचे अन्न लुटणारे माफिया समाजाच्या गळ्यातील फास आहेत” अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाने भ्रष्टाचाराविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे.
रिपब्लिकन पक्षाच्या ठाम मागण्या
1. दोषी अधिकारी, मुख्याध्यापक व गोडाऊन कीपर यांना तात्काळ निलंबित करून विभागीय चौकशी करावी.
2. पकडलेल्या ट्रकचा मालक, चालक व ठेकेदार यांच्यावर त्वरित फौजदारी गुन्हे दाखल करावेत.
3. ट्रक कायमस्वरूपी जप्त करून संबंधितांचे लायसन्स रद्द करावे.
4. जिल्ह्यातील सर्व शाळा व गोडाऊनची सखोल चौकशी करून संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करावा.
5. आरोपींना जेलमध्ये न टाकल्यास प्रशासनाचे संगनमत असल्याचे समजेल.

आंदोलनाचा इशारा

जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देताना प्रशासनाला थेट इशारा दिला :

“विद्यार्थ्यांचे अन्न लुटणारे हे भ्रष्ट माफिया जर तुरुंगात गेले नाहीत तर आम्ही रस्त्यावर उतरू. धाराशिव पेटल्याशिवाय राहणार नाही. प्रशासनाने फक्त आश्वासने न देता तात्काळ कठोर कारवाई केली पाहिजे. अन्यथा मोठ्या प्रमाणावर तीव्र आंदोलन छेडले जाईल आणि त्याचे परिणाम जिल्हा प्रशासनाला भोगावे लागतील.”

प्रशासनाची कसोटी

या घोटाळ्यामुळे जिल्हा प्रशासनाची प्रतिष्ठा धोक्यात आली आहे. गरीब विद्यार्थ्यांच्या हक्काचा घास लाटणाऱ्या माफियांवर तातडीने व कठोर कारवाई झाली नाही तर जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाईल, अशी चर्चा सर्वत्र आहे.

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement