धाराशिव, (शेख जाफरोद्दीन रब्बानी) :
धाराशिव नगर पालिका प्रभाग क्रमांक 17 मधून ज्येष्ठ समाजसेवक आणि मुस्लिम समाजातील आदरणीय व्यक्तिमत्व नादेरुल्लाह हुसैनी सर यांची दावेदारी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. समाजमाध्यमांवर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून "नादेर सर लढणार!" अशा संदेशांनी जोर धरला असून स्थानिक पातळीवर राजकीय समीकरणेही तापू लागली आहेत.
नादेरुल्लाह हुसैनी हे धाराशिव शहरातील प्रतिष्ठित नागरिक असून, त्यांनी यापूर्वी उस्मानाबाद नगर पालिकेचे दोन कार्यकाळ सदस्य म्हणून यशस्वी काम पाहिले आहे. 2016 च्या नगर पालिका निवडणुकीत त्यांना थोड्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र पराभवानंतरही त्यांनी समाजकारणातील आपला प्रवास अखंड सुरू ठेवला.
नादेर सर यांची समाजकारणातील वेगळी ओळख आहे. ते “हजरत खाजा शामशुद्दीन गाझी (रह.) वेल्फेअर सोसायटी” या संस्थेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून गरीब आणि गरजूंसाठी सातत्याने काम करत आहेत. या संस्थेच्या वतीने दरवर्षी “५१ शादीयों के नावाने सामूहिक विवाह सोहळा” आयोजित केला जातो. आजपर्यंत हजारहून अधिक जोडपी या सोहळ्यात विवाहबद्ध झाली आहेत, ही नादेर सरांच्या सामाजिक बांधिलकीची साक्ष आहे.
याशिवाय, ते गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहाय्य देतात तसेच आरोग्य सेवेतही नेहमी आघाडीवर असतात. कोरोना काळात त्यांनी रुग्णसेवेसाठी एम्बुलन्सची सुविधा उपलब्ध करून दिली, ज्याचा लाभ अनेकांना झाला.
एक भागापुरते नव्हे तर धाराशिव जिल्ह्यातील मुस्लिम समाजाच्या अडचणी सोडविणारे, समाजाच्या सर्व स्तरातील प्रश्न मांडणारे सक्षम नेतृत्व स्थानिक राजकारणात सक्रीय असले पाहिजे, अशी जनसामान्यांची अपेक्षा व्यक्त होत आहे.
प्रभाग क्रमांक 17 मधील मतदारसंघात नादेरुल्लाह हुसैनी सर यांचे मोठे जनाधार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. नागरिकांमध्येही “या वेळी नादेर सरांना संधी द्यावी” अशी भावना दिसून येत आहे.
आगामी नगर पालिका निवडणुकीत नादेरुल्लाह हुसैनी सर आपली दावेदारी अधिकृतपणे जाहीर करतात का, आणि जनतेचा प्रतिसाद कसा मिळतो, हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरेल.
0 Comments