धाराशिव, ता. ७ :
धाराशिव शहरातील राजकारणात माजी नगराध्यक्ष स्वर्गीय सत्तार शेख यांचे नाव आजही आदराने घेतले जाते. चार टर्म नगरसेवक राहून त्यांनी धाराशिव शहराच्या विकासासाठी उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्यांच्या कार्यकाळात शहराच्या सर्वांगीण विकासाकडे त्यांनी विशेष लक्ष दिले. सामाजिक, शैक्षणिक आणि नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी विविध उपक्रम राबवले होते.
सत्तार शेख हे माजी मंत्री डॉ. पदमसिंह पाटील यांचे विश्वासू सहकारी आणि कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते. नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात त्यांनी सर्व समाज घटकांना सोबत घेऊन काम केले. शहरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यास ते नेहमीच पुढे असायचे.
सन २०१८ मध्ये त्यांच्या निधनानंतर त्यांच्या समाजसेवेचा वारसा त्यांच्या पुतण्याने अस्लम शेख यांनी पुढे चालविला. अस्लम शेख हे देखील सामाजिक कार्यात आघाडीवर असून, प्रत्येक घटकातील समस्या सोडविण्यासाठी ते सदैव तत्पर असतात.
दरम्यान, आगामी धाराशिव नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वर्गीय सत्तार शेख यांची सून समीरा अमीर शेख हे प्रभाग क्रमांक १७ मधून निवडणूक लढविणार असल्याची जोरदार चर्चा प्रभागात सुरू आहे. या चर्चेमुळे स्थानिक राजकारणात चांगलीच चुरस निर्माण झाली आहे.
प्रभागातील नागरिकांचे म्हणणे आहे की, “सत्तार शेख यांनी आमच्या भागासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या कार्यकाळात झालेल्या विकासाची तुलना आजही कोणी करू शकत नाही. त्यामुळे त्यांच्या घरातील उमेदवाराला आम्ही सहकार्य करून विजयी करू,” असे मत अनेक नागरिकांनी व्यक्त केले आहे.
राजकीय पातळीवर सत्तार शेख यांच्या कुटुंबीयांच्या पुनरागमनामुळे धाराशिवच्या स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची शक्यता वर्तवली जात आहे.
0 Comments