धाराशिव — ऑनलाईन फसवणुकीच्या वाढत्या घटनांमध्ये आणखी एक गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. धाराशिव जिल्ह्यातील चोराखळी येथील साखर कारखान्यातील अधिकारी बाबासाहेब कचरु वाडेकर (वय 51) यांनी सायबर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्याकडून तब्बल 1 कोटी 10 लाख रुपये ऑनलाईन पद्धतीने फसवणूक करून उकळण्यात आले आहेत.
घटनेचा तपशील असा आहे की, दि. 15 एप्रिल 2025 रोजी सकाळी 6.57 वा. पासून ते दि. 17 एप्रिल 2025 रोजी दुपारी 1.22 वा. या कालावधीत एका अज्ञात व्यक्तीने मोबाईल क्रमांक 725958038 चा वापर करून संपर्क साधला. संबंधित व्यक्तीने कारखान्याचे चेअरमन अमर पाटील यांचा फोटो डी.पी. (प्रोफाईल फोटो) म्हणून वापरत, आपली खोटी ओळख लपवून स्वतःला अमर पाटील असल्याचे भासवले.
या खोट्या विश्वासावरून फिर्यादी वाडेकर यांना बँक खाते क्रमांक 20100043466464 वर 1 कोटी 10 लाख रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करण्यास भाग पाडण्यात आले. ही सर्व रक्कम फसवणूक करून मिळवली गेली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
फिर्यादीने याबाबत तातडीने सायबर पोलीस ठाण्यात दिनांक 17 एप्रिल रोजी प्रथम तक्रार नोंदवली. त्यावरून सायबर पोलीसांनी तत्काळ कारवाई करत भारतीय दंड विधान कलम 318(4) सह माहिती तंत्रज्ञान सुधारित अधिनियम 2008 चे कलम 66(C) आणि 66(D) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
सायबर पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. नागरीकांनी अशा फसवणुकीपासून सावध राहावे, आणि कुणीही ऑनलाईन व्यवहार करताना खात्रीशीर पडताळणी केल्याशिवाय कोणतीही रक्कम ट्रान्सफर करू नये, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
0 Comments