धाराशिव, दि. 23 जुलै : धाराशिव शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून, नागरिकांच्या सुरक्षेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. विशेषतः खाटीक समाजाच्या मांस व्यवसायावर असलेल्या बंदीमुळे कुत्र्यांचे नैमित्तिक अन्न कमी झाले असून, त्यामुळे कुत्र्यांनी आक्रमक रूप धारण केल्याचे दिसत आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरातील अनेक भागांत कुत्र्यांचे टोळके फिरताना दिसत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विशेषतः सकाळी शाळेत जाणारी मुले आणि सायंकाळी कामावरून घरी परतणारे नागरिक यांना अधिक त्रास सहन करावा लागत आहे.
नेहरू चौक आणि शम्स चौक परिसरात कुत्र्यांचा धुमाकूळ
दिनांक 23 जुलै रोजी नेहरू चौक आणि शम्स चौक परिसरात कुत्र्यांनी अचानक सहा ते सात नागरिकांवर हल्ला चढवला. विशेष बाब म्हणजे यामध्ये काही लहान मुलेही जखमी झाली आहेत. या सर्व जखमींवर धाराशिव वैद्यकीय महाविद्यालयात उपचार करण्यात आले असून, त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
मटण दुकाने बंद असल्याने कुत्रे उपाशी – नागरिकांची प्रतिक्रिया
खाटीक समाजाच्या मांस विक्रीवरील बंदीमुळे शहरातील अनेक मटण दुकाने बंद आहेत. याचा प्रत्यक्ष परिणाम भटक्या कुत्र्यांवर झाला असून, नेहमी दुकानांजवळ मिळणारे अन्न बंद झाल्याने ते उपाशी राहून आक्रमक झाले आहेत.
"दुकाने बंद असल्यामुळे कुत्र्यांना अन्न मिळत नाही. त्यामुळेच हे हल्ले वाढले आहेत," असे स्थानिक रहिवासी सांगतात.
नगरपरिषदेवर टीका; तात्काळ उपाययोजनांची मागणी
या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. नगरपरिषदेने याबाबत कुठल्याही प्रकारची कारवाई केली नसल्यामुळे प्रशासनावर टीका होत आहे.
"नगर परिषद कुत्र्यांचा उपद्रव रोखण्यासाठी तात्काळ पावले उचलावीत," अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिकांनी केली आहे.
शाळकरी मुलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह
कुत्र्यांचा उपद्रव विशेषतः शाळकरी मुलांसाठी धोकादायक ठरत असून, काही पालकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवणेही टाळले आहे. सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेत कुत्र्यांची संख्याही अधिक असते, त्यामुळे पालकांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे.
शासनाची भूमिका महत्त्वाची
ही समस्या केवळ कुत्र्यांच्या आक्रमकतेपुरती मर्यादित नाही, तर ही एक सार्वजनिक आरोग्याची आणि सुरक्षिततेची गंभीर बाब आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देत, कुत्र्यांचे निर्बंध, जनजागृती आणि तातडीच्या उपाययोजनांसाठी पावले उचलली पाहिजेत.
0 Comments