धाराशिव : आगामी धाराशिव नगरपालिका निवडणूक 2025 अंतर्गत आज दिनांक 16 नोव्हेंबर रोजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक 14 मधून शौकत शेख यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी शौकत शेख यांनी दर्गा हजरत खाजा शमशुद्दीन गाजी येथे भेट देत चादर चढविली, तसेच छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. धार्मिक आणि सामाजिक श्रद्धास्थानांप्रती व्यक्त केलेल्या या आदरांजलीनंतरच त्यांनी औपचारिकरित्या नामांकन प्रक्रिया पूर्ण केली.
शहरातील सामाजिक कार्यात सातत्याने सक्रिय असलेल्या शौकत शेख यांच्या कामगिरीबाबत नागरिक सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. कोरोना काळात त्यांनी केलेली मदत, तसेच यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित नागरिकांना दिलेली आर्थिक मदत यामुळे त्यांच्याबद्दल विश्वास अधिक दृढ झाला आहे.
पक्षाने सोपवलेल्या जबाबदाऱ्यांचे त्यांनी प्रामाणिकपणे पालन केले असून, खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांचे ते विश्वासू कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात.
उमेदवारी अर्ज दाखल करताना शौकत शेख यांनी प्रभावी शक्ती प्रदर्शन केले. मोठ्या संख्येने कार्यकर्ते व समर्थक धाराशिव नगरपरिषद परिसरात उपस्थित राहून त्यांनी त्यांना भक्कम पाठिंबा दिला.
शौकत शेख यांनी आपला उमेदवारी अर्ज धाराशिव नगरपरिषद निवडणूक निर्णयाधिकारी ओंकार देशमुख आणि उप निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती नीता अंधारे यांच्याकडे सादर केला.
प्रभाग क्रमांक 14 मधील निवडणुकीची रंगत आता अधिकच वाढली असून, पुढील राजकीय हालचालींकडे नागरिकांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.
0 Comments