Ad Code

Responsive Advertisement

भूमी अभिलेख कार्यालयातील लिपिक 2000 रूपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक

भूमी अभिलेख कार्यालयातील लिपिक 2000 रूपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक
धाराशीव (प्रतिनिधी) – उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, वाशी, जिल्हा धाराशीव येथे कार्यरत असलेले आवक-जावक लिपिक दिगंबर मारुती ढोले (वय 45 वर्षे) यांना लाच घेताना आज दिनांक 27 मे 2025 रोजी रंगेहाथ अटक करण्यात आली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धाराशीव युनिटने यशस्वीरित्या पार पाडली.

तक्रारदार (वय 55 वर्षे) यांनी आपल्या आईच्या नावावर असलेल्या गट क्रमांक 444 मधील शेतजमिनीच्या कायम मोजणीसाठी संबंधित कार्यालयात अर्ज दिला होता. त्यानुसार दिनांक 7 मे 2025 रोजी जमिनीची मोजणी करण्यात आली. मात्र, त्यानंतर हद्द कायम खुणा करण्याच्या मोबदल्यात लिपिक ढोले यांनी तक्रारदाराकडे 3000 रूपयांची लाच मागितली होती. यासंदर्भात तक्रारदाराने 23 मे रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धाराशीव येथे तक्रार दाखल केली होती.

तक्रारीची पडताळणी करताना दिनांक 26 मे रोजी पंचासमक्ष लिपिक ढोले यांनी 3000 रूपयांची मागणी केली असून तडजोडीनंतर 2000 रूपये घेण्यास तयार असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार आज सापळा रचून ढोले यांना 2000 रूपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.

त्यांच्याकडून लाच रक्कम व एक ओप्पो कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आला असून घरझडतीची प्रक्रिया सुरू आहे. आरोपीविरुद्ध भ्र.प्र. अधिनियम 1988 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून त्यांना अटक करण्यात आली आहे. मोबाईल जप्त करून तपासासाठी ताब्यात घेण्यात आला आहे.

या कारवाईचे मार्गदर्शन पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलिस अधीक्षक मुकुंद आघाव (लाप्रवि, छत्रपती संभाजीनगर) यांनी केले. सापळा कारवाई पोलीस निरीक्षक विकास राठोड यांच्या नेतृत्वात पार पडली, तर पोलीस उपअधीक्षक सिद्धाराम म्हेत्रे यांनी पर्यवेक्षण केले. पथकात पोलीस अंमलदार आशिष पाटील, विशाल डोके, जाकेर काझी तसेच चालक पो.ना. दत्तात्रय करडे यांचा समावेश होता.

लाचखोरीविरोधात तक्रार करण्यासाठी टोल फ्री क्रमांक 1064 वर तसेच पोलीस अधीक्षक – 9923023361 आणि पोलीस उप अधीक्षक – 9594658686 वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement