वाशी, २५ मे २०२५ | युवा मशाल प्रतिनिधी
वाशी तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात आरोग्य व्यवस्थेचा बुरखा फाटला आहे. नगरसेवक बळवंतराव श्रीमंतराव कवडे यांनी स्वत: एका घटनेचा साक्षीदार होत, या रुग्णालयातील अमानवीय परिस्थितीचा पर्दाफाश केला आहे.
२५ मे रोजी पहाटे, एका गंभीर अपघातानंतर जखमी रुग्णाला वाशीच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आलं. मात्र, तिथे रुग्णालय नसून एक अंधाऱ्या भुताटकी कोठडीचं दृश्य उभं राहिलं. लाईट नव्हता, डॉक्टर नव्हते, आणि कोणतीही यंत्रणा कार्यरत नव्हती.
"हा दवाखाना नाही – हे मृत्युचं वासस्थान आहे!" अशा कठोर शब्दांत नगरसेवक कवडे यांनी संताप व्यक्त केला. त्यांचं म्हणणं आहे की, सरकारने जनरेटर उपलब्ध करून दिला असला, तरी तो देखील धूळ खात पडलेला आहे. आपत्कालीन प्रसंगी जर व्यवस्था कोलमडली, तर याला जबाबदार कोण?
महिला, वृद्ध आणि गंभीर रुग्ण अंधारात तडफडत होते. यावेळी प्रशासनाची बेपर्वाई आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा अनुपस्थितीमुळे गंभीर संकट निर्माण झालं होतं. "ही केवळ निष्काळजीपणा नाही – ही व्यवस्थात्मक हत्या आहे!" असा घणाघात कवडे यांनी केला.
ते पुढे म्हणाले, "जर यावर तात्काळ कारवाई झाली नाही, तर आम्ही रुग्णांच्या नातेवाईकांसह रस्त्यावर उतरू, आणि गाफील प्रशासनाला जागं करू!"
नगरसेवकांनी दिलेला इशारा प्रशासनासाठी गंभीर आव्हान ठरू शकतो. आता बघावं लागेल की जिल्हा प्रशासन यावर काय पावलं उचलतं?
0 Comments